Hashtagintro

Kolhapur News : महावितरणच्या अकृषिक व्यवसाय सूचीकरणाला वेग

सुनील सकटे

कोल्हापूर : महावितरण कंपनीच्या अकृषिक वीज वितरण व्यवसायाचे सूचीकरण (लिस्टिंग) करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महावितरणच्या संचालक मंडळावर सहा स्वतंत्र संचालकांची निवड करण्यासाठी शासनाने एक विशेष निवड समिती स्थापन केली असून ऊर्जा विभागाने यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केला आहे.

राज्य शासनाने २१ एप्रिल २०२६ रोजी महावितरणच्या आर्थिक पुनर्रचनेला, कृषी वितरण व्यवसायाच्या विभाजनाला (ॲग्री डिमर्जर) आणि अकृषिक वीज वितरण व्यवसायाच्या सूचीकरणाला मान्यता दिली होती. या मोठ्या पुनर्रचना प्रक्रियेचा एक भाग म्हणून, संचालक मंडळावर सहा स्वतंत्र संचालक नियुक्त करण्याची विनंती महावितरणने शासनाकडे केली होती. ही संपूर्ण निवड प्रक्रिया पारदर्शक आणि व्यावसायिक पद्धतीने पार पाडण्यासाठी शासनाने ही समिती गठित केली आहे.

नियोजन विभागाचा अतिरिक्त कार्यभार असलेले मुख्य सचिव या समितीचे अध्यक्ष असतील. तसेच ऊर्जा विभागाचे अपर मुख्य सचिव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव आणि महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाचे (महाऊर्जा) महासंचालक हे या समितीचे सदस्य असतील. ऊर्जा विभागाचे सहसचिव सदस्य सचिव म्हणून काम पाहतील. गरजेनुसार अन्य तज्ज्ञ व्यक्तींनाही निमंत्रित सदस्य म्हणून बोलावण्याचे अधिकार समितीला देण्यात आले आहेत.

नियुक्त्यांकडे वीज क्षेत्राचे लक्ष

स्वतंत्र संचालकांच्या निवडीसाठी केंद्र शासनाच्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स’ (आयआयसीए) या संस्थेच्या ऑनलाईन डेटाबँकेचा आधार घेतला जाणार आहे. या डेटाबँकेत स्वतंत्र संचालक म्हणून काम करण्यास पात्र व इच्छुक असलेल्या अनुभवी व्यक्तींची माहिती उपलब्ध आहे. या डेटाबँकेसह अन्य स्रोतांमधून योग्य उमेदवारांची छाननी करून समिती शासनाकडे अंतिम शिफारस करेल. महावितरणच्या सूचीकरणासाठी स्वतंत्र संचालकांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याने, समितीच्या शिफारशी व आगामी नियुक्त्यांकडे संपूर्ण वीज क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language