Hashtagintro

Koyna Dam : कोयना धरणात ८८ टीएमसी पाणीसाठा

गणेशचंद्र पिसाळ

पाटण : या जलवर्षातील पाच महिन्यात कोयना धरणात १३३.२३ टीएमसी पाण्याची आवक झाली. यापैकी आतापर्यंत वापर व विनावापर पाणी वगळता आगामी सात महिन्यांसाठी धरणात उपलब्ध ८८.३३ पैकी उपयुक्त ८३.२१ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षीच्या तुलनेत सध्या १५ टीएमसी पाणीसाठा कमी असून आत्तापर्यंत सिंचनासाठी तब्बल ७.११ टीएमसी पाणीवापर झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत आत्तापर्यंत जादा वीजनिर्मिती झाली असली तरी आगामी काळात कोयनेतील पाण्यावर अवलंबून सिंचनासह जलविद्युत निर्मितीसाठी प्रशासकीय काटेकोर नियोजन व सर्वसामान्यांसह शेतकर्‍यांनी किमान पाण्याचा वापर हे धोरण अत्यंत कठोरपणे राबवावे लागण्याची तांत्रिक परिस्थिती सध्या कोयना धरणात पहायला मिळत आहे.

यावर्षी अल निनोचा धोका व हवामान खात्याचा कमी पावसाचा अंदाज असतानाही कोयना धरणांतर्गत विभागात सरासरीच्या तुलनात्मक थोडा कमी पाऊस झाला. परंतु गतवर्षीच्या तुलनेत तब्बल ४७.५४ टीएमसी पाण्याची कमी आवक झाली आहे. एक जूनपासून सुरू झालेल्या या जलवर्षात पावसाळ्यातील प्रमुख चार महिन्यात धरणात १३३.५७ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. १ जून २०२६ पासून सुरू झालेल्या नव्या वर्षारंभाला धरणात १५.८८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. तर यावर्षी अल निनोचा प्रभाव व हवामान खात्याने सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त केल्यामुळे धरणातील पाणीसाठा व पाऊस याबाबत सार्वत्रिक चिंता व्यक्त होत होती.

याच पार्श्वभूमीवर सुरुवातीला पश्चिमेकडील जलविद्युत निर्मिती पूर्णपणे बंद करण्यात आली होती. तर सिंचनामध्ये शेती व औद्योगिक वापरासाठी लागणारे पाणीही पूर्णपणे बंद करून केवळ पिण्याच्या पाण्यासाठीच पाणी सोडले जात होते. या जलवर्षात आत्तापर्यंत धरणात १३३.२३ टीएमसी पाण्याची आवक झाली असून आत्तापर्यंत त्यापैकी पश्चिम वीजनिर्मितीसाठी २४.७१ टीएमसी तर पूर्वेकडे सिंचनासाठी पायथा वीज गृहातून वीजनिर्मिती करून ४.६७ तर धरण दरवाजातून विनावापर १.६२ असा एकूण ६.२९ टीएमसी पाणीवापर झाला आहे. याशिवाय पूरकाळात २.४४ टीएमसी पाणी पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून सोडण्यात आले. तर विनावापर २५.६९ टीएमसी पाणी सोडण्यात आले. त्यामुळे वापर व विनावापर असे आत्तापर्यंत ५९.१३ टीएमसी पाणी जाऊन सध्या धरणात उपलब्ध ८८.३३ पैकी उपयुक्त ८३.२१ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.

धरणाच्या जलवर्षेपूर्तीला अद्याप सात महिन्यांचा कालावधी आहे, पश्चिमेकडे वर्षभरात जलविद्युत निर्मितीसाठी ६७.५० टीएमसी पाणी कोटा आरक्षित असतो. त्यापैकी आतापर्यंतच्या पाच महिन्यात २४.७१ टीएमसी पाणी वापरण्यात आले आहे. उर्वरित सात महिन्यांसाठी आरक्षीत ४२.७९ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. या पुढच्या सात महिन्यात पश्चिम जलविद्युत निर्मितीसाठी ४२.७९, मृतसाठा ५ टीएमसी मृतसाठा वगळता त्यानंतर सरासरी ४० टीएमसी पाणी सिंचनासाठी शिल्लक राहू शकते.

परंतु यावर्षी अगदी पावसाळ्यातही सिंचनासाठीची पाणी मागणी लक्षात घेता आत्तापर्यंत सिंचनाला ज्यादा पाणीवापर झाला आहे. या पुढच्या काळात सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी कोयना धरणावर सार्वत्रिक भिस्त असल्याने मग स्थानिक जलविद्युत निर्मितीच्या आरक्षित कोट्याला ऐनवेळी कात्री लावून जास्तीत जास्त पाणी सिंचन व पिण्यासाठी वापरण्यात येण्याच्या दाट शक्यता आहेत. इतर ठिकाणची प्रचंड दुष्काळी व पाणीटंचाई परिस्थिती लक्षात घेता कोयना धरणातील सध्याचा शिल्लक पाणीसाठा लक्षात घेता ३१ मे अखेर या तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागणारच आहे. याशिवाय आगामी जल वर्षातील पहिल्या जून, जुलै महिन्यात अपेक्षित पाऊस पडेपर्यंत या पाण्याचा काटेकोर वापरही तितकाच गरजेचा आहे. एका बाजूला धरण व्यवस्थापन असो अथवा ऊर्जा निर्मिती या दोन्ही ठिकाणी पाण्याचे काटेकोरपणे नियोजन गरजेचे आहे.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language