सांगली : कोयना जलविद्युत प्रकल्पातून वीज निर्मितीनंतर समुद्राला वाहून जाणारे ६७.५ टीएमसी पाणी मुंबईला वळवण्याचा प्रस्ताव पुढे आल्यानंतर सांगली जिल्ह्यातून विरोधाचे जोरदार सूर उमटू लागले आहेत. मुंबईला पाणी देण्यापूर्वी सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांच्या हक्काचे पाणी उपलब्ध करून द्या, अशी ठाम भूमिका जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी घेतली आहे.
जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी उच्चस्तरीय बैठकीत कोयना जलविद्युत केंद्रातून वीज निर्मितीनंतर समुद्रात जाणारे ६७.५ टीएमसी पाणी मुंबईला वळवण्याच्या प्रस्तावाची माहिती दिल्यानंतर सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील दुष्काळी भागाच्या पाणीवाटपाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
खासदार विशाल पाटील यांनीही या प्रस्तावाला विरोध दर्शविला. ते म्हणाले, सांगली आणि सातारा जिल्ह्यांच्या वाट्याचे पाणी मुंबईला नेण्याचा विचार करू नये. खानदेशातील नेत्यांनी पश्चिम महाराष्ट्राच्या पाण्याचे वाटप करण्याच्या भानगडीत पडू नये. आ. डॉ. विश्वजित कदम म्हणाले, पाणी वळवण्यापूर्वी प्रथम सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यांतील दुष्काळी जनतेचा विचार व्हायला पाहिजे. आमदार सुहास बाबर म्हणाले, मुंबईला पाणी देण्यास आमची हरकत नाही; मात्र आधी आमच्या वाट्याचे पाणी आम्हाला मिळाले पाहिजे.
माजी खासदार संजय पाटील म्हणाले, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांच्या हक्काचे पाणी या भागालाच मिळाले पाहिजे. येथील पाण्याची गरज पूर्ण न करता हक्काचे पाणी मुंबईला वळवण्यास आमचा ठाम विरोध आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष अॅड. बाबासाहेब मुळीक म्हणाले, कोयनेचे पाणी मुंबईला वळवण्याचा प्रस्ताव रद्द करावा. जलविद्युत निर्मितीसाठी होणारा पाण्याचा वापर कमी करून हे पाणी सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील दुष्काळी भागासाठी उपलब्ध करून द्यावे.
Source: Pudhari News
