
बॉलिवूडची प्रसिद्ध ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित सध्या ‘कोण होणार करोडपती’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन करत आहे. या कार्यक्रमात आतापर्यंत अनेक दिग्गज कलाकारांनी सहभाग घेतला आहे. अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या एका भागात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या टीमने हजेरी लावली आणि स्टुडिओत अक्षरशः हास्यकल्लोळ माजवला. याच भागाचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यावेळी माधुरी दीक्षितचा एकदम हटके आणि सातारी अंदाज पाहायला मिळाला. माधुरीने थेट एक उखाणा घेतला आहे.
सोनी मराठी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर कोण होणार करोडपती कार्यक्रमाचा प्रोमो शेअर केला आहे. प्रोमोमध्ये दिसत आहे की कार्यक्रमामध्ये हास्य कलाकार रोहित माने यांनी माधुरी दीक्षितसमोर एक खास इच्छा व्यक्त केली. ते म्हणाले, “मॅडम, सातारी भाषेचा लहेजा पकडून तुम्ही डॉ. श्रीराम नेनेंसाठी उखाणा घ्यावा अशी इच्छा आहे.” ही इच्छा ऐकताच प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. हॉटसीटवर समीर चौघुले आणि प्रियादर्शनी इंदलकर बसलेले असताना, ऑडियन्समधून रोहित माने यांनी ही विनंती केली.
View this post on Instagram
काय घेतला माधुरी दीक्षितने उखाणा?
माधुरी दीक्षितने लगेच सातारी स्टाइलमध्ये उखाणा घेत म्हटले, “एक होती चिऊ, एक होता काऊ… एक होती चिऊ, एक होता काऊ… डॉक्टरांचं नाव घेते, आता डोकं का खाऊ.” हे ऐकताच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची संपूर्ण टीम आणि प्रेक्षक खळखळून हसू लागले. या मजेदार क्षणाचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
Source: TV9 Marathi National
