Hashtagintro

Mahavitaran Engineer Bribery Case: महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याला लाच घेताना पकडले; भांडुप येथील स्थापत्य विभागात एसीबीची कारवाई

मुंबई: महावितरणच्या भांडुप येथील स्थापत्य विभागातील कार्यकारी अभियंत्याला ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी रंगेहाथ पकडले. देवेंद्र गिलुरकर (वय ५१) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे.

शासकीय सिव्हिल कामांची सुमारे २१ लाख रुपयांची थकीत बिले मंजूर करून देण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडे एक लाख ८० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.

तक्रारदार (वय ३७) यांनी जून २०२६ पासून महावितरणसाठी विविध सिव्हिल कामे केली होती. या कामांची थकीत बिले मंजूर करून देण्यासाठी गिलुरकर यांनी एक लाख ८० हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार संबंधित व्यक्तीने २६ ऑक्टोबर रोजी एसीबीच्या मुंबई कार्यालयात केली होती.

या तक्रारीच्या अनुषंगाने ३० ऑक्टोबर रोजी लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. त्यावेळी गिलुरकर यांनी एक लाख ८० हजार रुपये स्वीकारण्यास संमती दर्शवून ही रक्कम टप्प्याटप्प्याने देण्यास सांगितले. त्यातील पहिला हप्ता म्हणून ५० हजार रुपये देण्याची मागणी केली.

त्यानुसार सोमवारी, २ नोव्हेंबर रोजी एसीबीने भांडुप येथील महावितरणच्या स्थापत्य विभागात सापळा रचला. या कारवाईदरम्यान गिलुरकर यांना तक्रारदाराकडून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले. सायंकाळी पाचच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

आरोपी अधिकाऱ्याची अंगझडती घेण्यात आली असून, त्यांचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. घरझडतीची तयारी सुरू असून, लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती एसीबीच्या अहवालात देण्यात आली आहे.

या कारवाईचे पर्यवेक्षण सहायक पोलीस आयुक्त प्रवीण नावडकर यांनी केले. पोलीस निरीक्षक प्रतिभा राजेंद्र ढोकणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा कारवाई केली. अपर पोलीस आयुक्त संदीप दिवाण तसेच अपर पोलीस उपायुक्त अनिल घेरडीकर आणि अनंत साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language