कोल्हापूर : भारतीय सैन्य दलातील निवृत्त मेजर जनरल (व्ही.एस.एम.) एम. एन. तथा मधुकर नारायण काशीद (वय ७४) यांचे निधन झाले. पुणे येथे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे पत्नी अनिता काशीद, मुलगा कर्नल अमित काशीद, सून, नातू, भाऊ मेजर जनरल अनिल काशीद (सेवानिवृत्त), कॅप्टन अशोक काशीद असा मोठा परिवार आहे.
मेजर जनरल मधुकर काशीद हे एनडीएच्या माध्यमातून १९७४ साली तोफखाना विभागात सेकंड लेफ्टनंट म्हणून रुजू झाले. विविध ठिकाणी युनिट कमांडंट म्हणून ३९ वर्षे त्यांनी देशसेवा बजावली. त्यांनी आपल्या कारकिर्दीत सैन्य भरती प्रक्रिया सहज व सोपी केली. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना २००८ मध्ये विशिष्ट सेवा मेडलने सन्मानित करण्यात आले. ब्रिगेडियर असताना त्यांनी चायना बॉर्डरवर युनिट कमांड, ब्रिगेड कमांड, स्ट्रॅटजीकल कमांड अशा महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या. ते २०११ मध्ये निवृत्त झाले. त्यांचे वडील नारायण आप्पा काशीद हेही वायुसेनेत होते. यामुळे काशीद कुटुंबाला तीन पिढ्यांचा लष्करी वारसा लाभला आहे.
दिंडनेर्ली येथे आज अंत्यसंस्कार
त्यांचे पार्थिव सोमवारी (दि. ९) सकाळी १० वाजता आर.के.नगर येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून दुपारी १ वाजता, दिंडनेर्ली (ता. करवीर) या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहेत. यावेळी आजी- माजी सैनिक, पंचक्रोशीसह जिल्ह्यातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन वीर जवान आजी- माजी सैनिक वेल्फेअर असोसिएशन तर्फे करण्यात आले आहे.
Source: Pudhari News
