Hashtagintro

Master Ravi : स्टुडिओत लैंगिक गैरवर्तन, सेक्रेटरीकडूनही शोषण अन्…वयाच्या 12व्या वर्षी बॉलिवूड अभिनेत्यासोबत घडलेला भयानक प्रकार

Master Ravi : स्टुडिओत लैंगिक गैरवर्तन, सेक्रेटरीकडूनही शोषण अन्…वयाच्या 12व्या वर्षी बॉलिवूड अभिनेत्यासोबत घडलेला भयानक प्रकार

बॉलिवूडमध्ये बालकलाकार म्हणून काम करताना अनेक कलाकारांना चांगले-वाईट अनुभव येतात. काही कलाकारांना या क्षेत्रात प्रसिद्धी मिळते, तर काहींच्या वाट्याला नकोशा आठवणी येतात. अशाच एका धक्कादायक अनुभवाचा खुलासा ज्येष्ठ बालकलाकार मास्टर रवी अर्थात रवी वलेचा यांनी केला आहे. वयाच्या अवघ्या 8 वर्षांपासून त्यांच्यासोबत गैरवर्तनाचे प्रकार घडत होते. एका मुलाखतीत त्यांनी बालपणी सहन केलेल्या लैंगिक शोषणाबद्दल मोकळेपणानं भाष्य केलं आहे.

बालपणी तीन वेळा झाला गैरवर्तनाचा अनुभव

रवी वलेचा यांनी बालकलाकार म्हणून जवळपास 300 चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या बालपणीची भूमिका साकारली होती. ‘कुली’, ‘अमर अकबर अँथनी’, ‘मिस्टर नटवरलाल’, ‘खुद्दार’, ‘नास्तिक’, ‘यादों की बारात’ आणि ‘सीता और गीता’ यांसारख्या चित्रपटांत ते झळकले होते. मात्र, चित्रपटसृष्टीत काम करताना त्यांना बालपणी तीन वेळा गैरवर्तनाचा सामना करावा लागला.

सेक्रेटरीने हॉटेलमध्ये केलं शोषण

‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत रवी यांनी सांगितलं की, सुरुवातीच्या काळात रवी यांनी लैंगिक गैरवर्तनाचा सामना केला आहे. डबिंग स्टुडिओमध्ये एका वयस्कर व्यक्तीनं त्यांना मांडीवर बसण्यास सांगितलं होतं. या प्रसंगामुळे ते अस्वस्थ झाले होते. मात्र, सर्वात भयानक अनुभव एका तरुण सेक्रेटरीमुळे आला. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांच्यासोबत प्रवास करण्यासाठी सेक्रेटरीची नेमणूक करण्यात आली होती. प्रवासादरम्यान टॅक्सी आणि कारमध्ये तो त्यांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचा.

रवी अवघे 12 वर्षांचे असताना या सेक्रेटरीनं हॉटेलच्या खोलीत त्यांचं शोषण केलं. त्यावेळी त्यांचे आई-वडील त्यांच्यासोबत नव्हते आणि सेक्रेटरी त्यांच्याच खोलीत थांबला होता. त्या परिस्थितीत आपण काय करावं, हेच त्यांना समजत नव्हतं. कामानिमित्त दुसऱ्या दिवशीही त्याच व्यक्तीसोबत जावं लागायचं. त्यामुळे आपल्यासोबत घडणाऱ्या प्रकाराबद्दल कोणाला सांगण्याचं धाडस त्यांना होत नव्हतं.

आई-वडिलांनाही सांगण्याची वाटायची भीती

या कटू अनुभवाबद्दल बोलताना रवी यांनी सांगितलं की, त्यावेळी मनात खूप भीती होती. आपल्यासोबत घडणाऱ्या गोष्टी कोणाला सांगाव्यात, हे त्यांना कळत नव्हतं. आई-वडिलांना सांगितलं तर कदाचित त्यांचा विश्वास बसणार नाही, अशी भीतीही त्यांच्या मनात होती. त्यामुळे त्यांनी अनेक वर्षं या आठवणी मनात दाबून ठेवल्या. या घटनांचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर आणि वैयक्तिक आयुष्यावरही परिणाम झाला.

सहा महिन्यांच्या थेरपीने मिळाला दिलासा

अनेक वर्षं मनात दडवून ठेवलेल्या या अनुभवांचा सामना करण्यासाठी रवी यांनी थेरपीची मदत घेतली. ते म्हणाले की, थेरपीदरम्यान त्यांच्या मनात खोलवर दडलेल्या अनेक आठवणी पुन्हा समोर आल्या. सहा महिन्यांच्या उपचारांमुळे त्यांना या सगळ्यातून बाहेर पडण्यास मदत झाली. आता या अनुभवांबद्दल बोलताना त्यांना कोणताही संकोच वाटत नाही.

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language