
७० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांच्या जावयानं त्यांच्यावर आरोप केलेला की, त्या आपल्या मुलीला शेवटच्या वेळी भेटायलाही आल्या नाहीत. यामुळे मौसमी चर्चेत आलेल्या. शेवटी, बऱ्याच प्रतीक्षेनंतर पायलवर अंत्यसंस्कार करण्यात आले. एका मुलाखतीत मौसमी चॅटर्जी यांनी खुलासा केला की, एक वेळ अशी आलेली, जेव्हा त्या आपल्या मुलीच्या मृत्यूसाठी प्रार्थना करत होत्या.
काय घडलेलं नेमकं?
‘लहरें रेट्रो’ला दिलेल्या मुलाखतीत मौसमी म्हणाल्या, ‘तिनं (पायलनं) एक चूक केली आणि त्याची किंमत तिला चुकवावी लागली. आमच्या संपूर्ण कुटुंबाला त्याचे परिणाम भोगावे लागले. 2017 मध्ये पायल कोमात गेली होती. ती अधूनमधून त्यातून बाहेर यायची. पण, आम्हाला कोणत्याही अटींशिवाय तिला भेटण्याची परवानगीही नव्हती. त्यासाठी आम्हाला पोलीस आणि न्यायालयामार्फत जावं लागलं. पायललाही जायचं होतं, पण तिला घेऊन जाण्यासाठी मला देवाला प्रार्थना करावी लागली. तिला वेदनेत पाहणं मला सहन होत नव्हतं. एक दिवस आपल्या सर्वांनाच आपलं शरीर सोडावं लागणार आहे. मग या वेदना सहन करण्यात काय अर्थ आहे? जर तुमचं माझ्यावर प्रेम असेल, तर तुम्ही म्हणाल, ‘मला जाऊ द्या.”
दरम्यान, मौसमी चॅटर्जी यांची मोठी मुलगी पायलचं लग्न व्यावसायिक डिकी सिन्हा यांच्याशी झालं होतं. चॅटर्जी आणि डिकी कुटुंबाचे व्यावसायिक संबंधही होते. एका व्यावसायिक मतभेदामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये दुरावा निर्माण झाला. याच सुमारास, मौसमी चॅटर्जी यांची मुलगी पायल कोमात गेली.
2018 मध्ये, आपल्या मुलीच्या उपचारादरम्यान, मौसमी चॅटर्जी यांनी आपल्या जावयाविरुद्ध तक्रार दाखल केली, ज्यात त्यांनी आरोप केला की, तो तिची काळजी घेत नाही किंवा तिच्या उपचाराचा खर्च उचलत नाही. मौसमीच्या आरोपांना प्रत्युत्तर म्हणून, डिकी सिन्हा यांनी तिच्यावर मानहानीचा खटला दाखल केला आणि तो जिंकला.
तेव्हापासून दोन्ही कुटुंबांमधील संघर्ष इतका वाढला की, 2019 मध्ये पायलचं निधन झालं, तेव्हा मौसमी यांना लेकीला शेवटचं पाहताही आलं नाही. या संदर्भात डिकीनं सांगितलं होतं की, सर्वजण त्यांच्या येण्याची वाट पाहत होते, पण त्या आल्या नाहीत, तरीही त्यांची दुसरी मुलगी आणि पती अंत्यविधीला उपस्थित होते.
Source: TV9 Marathi Entertainment
