Hashtagintro

Mumbai Local Train Video Case: लोकलमधील महिलांचे मॉर्फ नग्न व्हिडीओ व्हायरल; तरुणाला अटक

मुंबई: लोकल ट्रेनमध्ये महिलांचे चित्रीकरण करून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून त्यांचे नग्न, अर्धनग्न छायाचित्रांत रूपांतर करणाऱ्या विकृत तरुणाला मुंबई पोलिसांच्या दक्षिण सायबर विभागाने अटक केली आहे. मोहम्मद साबीर मोहम्मद रुस्तम (३१) असे आरोपीचे नाव असून, तो वसई पूर्व परिसरात राहत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ जून रोजी रात्री ८.३५ च्या सुमारास १९ वर्षीय तरुणी तिच्या मैत्रिणीसोबत चर्चगेट ते विरार फास्ट लोकलच्या प्रथम श्रेणीच्या डब्यातून प्रवास करीत होती. यावेळी एका अनोळखी व्यक्तीने दोघींचेही त्यांच्या नकळत मोबाईलमध्ये चित्रीकरण केले.

त्यानंतर २७ जून रोजी ‘pile6531’ या इन्स्टाग्राम खात्यावरून अश्लील गाण्याच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला. संबंधित रीलला तब्बल एक लाख ११ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले होते. या प्रकरणी पीडित तरुणीने तक्रार दिल्यानंतर १९ ऑक्टोबर रोजी दक्षिण सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अटक केल्यानंतर आरोपीच्या मोबाईलची तपासणी केली असता, अनेक महिलांचे फोटो आणि व्हिडिओ आढळून आले.

पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे, अपर पोलीस आयुक्त कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त (सायबर गुन्हे) बजरंग बनसोडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सायरस इराणी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

पोलीस निरीक्षक फातिमा बागवान, सहायक पोलीस निरीक्षक ईशान खरोटे, पोलीस शिपाई नितीन शिंदे आणि महिला पोलीस शिपाई रेश्मा धुमाळ यांनी तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.

आरोपीची कोणतीही ओळख पोलिसांकडे नव्हती. त्याने ‘प्लेबॉय’ नावाने एका मुलीचा फोटो वापरून इन्स्टाग्राम खाते तयार केले होते. सायबर पोलिसांनी बहुस्तरीय तांत्रिक तपास, डिजिटल पुरावे आणि सोशल मीडिया खात्यांचे विश्लेषण करून आरोपीचा माग काढला.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language