Nashik : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीपात्रातील पाण्याचे नियोजन आणि रामकुंड परिसरातील स्वच्छतेसाठी नाशिक महापालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. रामकुंडासह परिसरातील विविध कुंडांमध्ये पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी ११ नवीन गेट बसविण्यात आले आहेत. या कामासाठी महापालिकेने ५७ लाख ४ हजार ७०४ रुपये खर्च केले आहेत. या नव्या व्यवस्थेमुळे कुंडांमधील पाण्याची पातळी नियंत्रित करणे, आवश्यकतेनुसार पाणी सोडणे आणि कुंडांची स्वच्छता करणे अधिक सोपे होणार आहे.
रामकुंडासह चार ठिकाणी नवीन गेट
सिंहस्थ कुंभमेळ्यात लाखो भाविक रामकुंड परिसरात स्नानासाठी दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोदावरी नदीपात्रातील पाण्याचे व्यवस्थापन आणि कुंडांची स्वच्छता यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यासाठी महापालिकेकडून रामकुंड, द्वितोंड्या मारुती परिसर, ताळकुटेश्वर मंदिराजवळ आणि गांधी तलाव येथे नवीन गेट बसविण्यात आले आहेत. यापूर्वी २००३ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी लोखंडी गेट बसविण्यात आले होते. मात्र, दीर्घकाळ वापरामुळे हे गेट जुने आणि नादुरुस्त झाले होते. त्यामुळे पाणीसाठ्याचे नियंत्रण करणे तसेच कुंड रिकामे करून तळातील गाळ आणि घाण काढणे अडचणीचे ठरत होते. नवीन गेट बसविल्यामुळे या समस्या दूर होण्यास मदत होणार आहे.
https://www.prahaar.in/2026/10/23/nashik-momentum-for-nashiks-ramkal-path-project-approval-granted-for-an-expenditure-of-12-crore-for-the-development-of-the-kalaram-kapaleshwar-temple-precinct/
कास्ट आयर्न गेटमुळे यंत्रणा अधिक टिकाऊ
नव्याने बसविण्यात आलेले गेट कास्ट आयर्नपासून तयार करण्यात आले असून, ते उघडण्यासाठी आणि बंद करण्यासाठी स्टेनलेस स्टीलच्या स्पिंडलचा वापर करण्यात आला आहे. या यंत्रणेमुळे गेटचे संचालन अधिक सुलभ होणार असून, त्यांची टिकाऊ क्षमताही वाढणार आहे.गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्याचे रोटेशन नसतानाही गेट बंद करून विविध कुंडांमध्ये पाणीसाठा करता येणार आहे. तसेच आवश्यकतेनुसार कुंड रिकामे करून तळातील गाळ आणि साचलेली घाण काढणे शक्य होणार आहे. त्यामुळे कुंडांची नियमित स्वच्छता आणि पाण्याचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता येईल.
कुठे किती गेट बसविले ?
महापालिकेने एकूण ११ नवीन गेट बसविण्यासाठी ५७.०५ लाख रुपये खर्च केले आहेत. त्याचा ठिकाणनिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे.
– रामकुंड : २ गेट
– द्वितोंड्या मारुती परिसर : २ गेट
– ताळकुटेश्वर मंदिराजवळ : २ गेट
– गांधी तलाव : ५ गेट
या व्यवस्थेमुळे नदीपात्रातील पाण्याचे वितरण आणि विविध कुंडांमधील पाणीसाठा नियंत्रित करणे अधिक सोयीचे होणार आहे.
भाविकांच्या स्नानासाठी पाण्याचे नियोजन सुलभ
सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान रामकुंड परिसरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होणार असल्याने स्नान आणि धार्मिक विधींसाठी पाण्याची उपलब्धता महत्त्वाची ठरणार आहे. नवीन गेटमुळे आवश्यकतेनुसार कुंडांमध्ये पाणी साठवून ठेवणे आणि स्वच्छतेसाठी पाणी बाहेर सोडणे शक्य होईल. यामुळे कुंडांच्या देखभालीला गती मिळण्याबरोबरच भाविकांसाठी स्वच्छ आणि सुयोग्य व्यवस्था उपलब्ध करून देण्यास मदत होणार आहे. जुन्या यंत्रणेऐवजी आधुनिक आणि टिकाऊ यंत्रणा उभारल्याने कुंभमेळ्याच्या तयारीतील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
ध्वजारोहण सोहळ्यापूर्वी रामकुंड परिसराच्या कामांना वेग
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील रामकुंड परिसरासह त्र्यंबकेश्वर येथेही तयारीला वेग आला आहे. रामकुंड परिसरातील आवश्यक कामे जवळपास पूर्ण झाली असून, प्रगतीपथावरील इतर कामांमुळे सोहळ्यात अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी मुरूम आणि माती टाकून सपाटीकरण केले जात आहे. ध्वजारोहण सोहळ्यापर्यंत रामकुंड आणि गोदाकाठ परिसर स्वच्छ व सुस्थितीत ठेवण्यावर प्रशासनाचा भर आहे. नवीन गेटची उभारणी, पाणीसाठ्याचे नियोजन आणि कुंडांच्या स्वच्छतेसाठी उपलब्ध झालेली सुधारित यंत्रणा यामुळे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या व्यवस्थापनाला मदत होण्याची अपेक्षा आहे.
Source: Prahaar News
