Hashtagintro

Nashik Accident News : मालेगावमध्ये भरधाव पेट्रोल टँकरची दुचाकीला धडक; महिलेचा जागीच मृत्यू, पती-मुलगा गंभीर जखमी

Malegaon Accident News: मालेगाव शहरातील अवजड वाहनांच्या वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरातील गजबजलेल्या एकात्मता चौकात सोमवारी (दि. १९) भरधाव पेट्रोल टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात येवला येथील रुक्साना शेख यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे पती हंजला शेख आणि मुलगा हसन शेख गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शहरातील अवजड वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.

एकात्मता चौकात भीषण अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, येवला येथील शेख कुटुंब उपचारासाठी दुचाकीवरून मालेगाव शहरात आले होते. यावेळी ते एकात्मता चौकातून जात असताना पाठीमागून वेगाने आलेल्या पेट्रोल टँकरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडकेनंतर दुचाकी काही अंतरापर्यंत फरफटत गेली. या दुर्घटनेत रुक्साना शेख या टँकरच्या पुढील चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे पती हंजला शेख आणि मुलगा हसन शेख हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेत जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले.
https://www.prahaar.in/2026/10/20/gunmen-who-shot-at-tiger-shroff-held-in-kota-while-fleeing-on-jaipur-bound-train-lawrence-bishnoi-gang/
कुसुंबा रोडनंतर आता एकात्मता चौकात अपघात
मालेगाव शहरात अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे अपघातांचा धोका वाढत असल्याची चिंता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. कुसुंबा रोडवर यापूर्वीही अनेक गंभीर अपघात घडले असून, या घटनांमध्ये नागरिकांना जीव गमवावा लागल्याचे समोर आले आहे. अवजड वाहनांच्या वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी आंदोलने करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, आता शहराच्या पश्चिम भागातील गजबजलेल्या एकात्मता चौकात महिलेचा बळी गेल्याने नागरिकांमधील संताप वाढला आहे. शहरातील अंतर्गत रस्त्यांवर अवजड वाहने दाखल होत असल्याने पादचारी, दुचाकीस्वार आणि इतर वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

अपघातानंतर टँकर चालक पोलिसांच्या ताब्यात
या अपघातानंतर पेट्रोल टँकर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. अपघातानंतर टँकर न थांबता पुढे गेल्याचा प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचेही सांगण्यात आले आहे. दरम्यान, शहरातील अवजड वाहनांच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. वारंवार होणारे अपघात आणि त्यात जाणारे निष्पाप नागरिकांचे बळी लक्षात घेता, वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी कधी होणार, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
मालेगावमधील अवजड वाहनांच्या वाहतुकीचा प्रश्न आता केवळ वाहतूक व्यवस्थेपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित गंभीर मुद्दा बनला आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासन कोणती पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language