नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दत्तनगर – अंबड परिसरातील प्रदूषित पाण्याच्या घटनेनंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) महापालिका हद्दीतील अंबड आणि सातपूर औद्योगिक वसाहतींमध्ये केलेल्या सर्वेक्षणात तब्बल १९३ उद्योग जलप्रदूषणास कारणीभूत असल्याचे आढळून आले आहे. यामध्ये १४६ इलेक्ट्रो प्लेटिंग उद्योगांचा समावेश असून, त्यापैकी ६६ उद्योगांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. ३० उद्योगांना बंदचे निर्देश, तर २३ उद्योगांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आल्याची माहिती एमपीसीबीने उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून समोर आली आहे. दरम्यान, गोदावरी, नंदिनी नदी आणि स्थानिक नाल्यांमधील पृष्ठभागावरील पाण्यात क्रोमियम आढळले नसले तरी बोअरवेलच्या पाण्याच्या नमुन्यांमध्ये क्रोमियमचे अंश आढळल्याचा धक्कादायक निष्कर्ष अहवालात नोंदविण्यात आला आहे.
गोदावरी प्रदूषणप्रकरणी उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान राज्याच्या मुख्य सचिवांच्या निर्देशानुसार एमपीसीबीने आपला अहवाल सादर केला आहे. अंबड आणि सातपूर एमआयडीसी परिसरात सुमारे तीन हजार उद्योग असून, त्यापैकी १९३ उद्योग जलप्रदूषण करणारे असल्याचे सर्वेक्षणात निष्पन्न झाले आहे. या उद्योगांवर नियंत्रण आणण्यासाठी मंडळाने कारवाई सुरू केली आहे. ३० उद्योगांना बंद करण्याचे निर्देश, २३ उद्योगांना कारणे दाखवा नोटीस, तर तीन उद्योगांना स्वेच्छेने उद्योग बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आल्याचे अहवालात नमूद आहे. पाणी नमुन्यांच्या तपासणीत पृष्ठभागावरील
पाण्याची स्थिती आणि भूजलाची स्थिती
यामध्ये तफावत आढळली आहे. गोदावरी, नंदिनी नदी तसेच स्थानिक नाल्यांमधील पाण्यात क्रोमियम आढळले नसल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, दि. १८ नोव्हेंबर रोजी तपासणीसाठी घेण्यात आलेल्या १० बोअरवेलच्या नमुन्यांपैकी पाच नमुन्यांमध्ये क्रोमियमचे प्रमाण आढळले.
काही नमुन्यांमध्ये एकूण क्रोमियमचे प्रमाण ०.२९ ते ५८.२० मिग्रॅ प्रतिलिटर, तर हेक्साव्हॅलेंट क्रोमियमचे प्रमाण ३७.५० मिग्रॅ प्रतिलिटरपर्यंत नोंदविण्यात आले आहे. त्यामुळे भूजल प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
बायोप्सीत आठ नागरिकांना दाहक संपर्क त्वचारोग
दत्तनगर-अंबड येथील तुळजाभवानी मंदिर परिसरात त्वचारोगाचा समूह आढळल्याच्या आरोग्य विभागाच्या नोंदीही अहवालात देण्यात आल्या आहेत. या परिसरातील ८ हजार ८८७ घरांचे सर्वेक्षण करून, ३४ हजार ३९९ नागरिकांची तपासणी करण्यात आली. आठ आरोग्य शिबिरांमध्ये २०८ त्वचारोगाचे रुग्ण आढळले. त्यापैकी १०० टक्के रुग्णांनी खाज, ८७.८ टक्के रुग्णांनी पुरळ, तर ८० टक्के रुग्णांनी त्वचेवर लालसरपणा येत असल्याची तक्रार केली. तब्बल ८१.१ टक्के रुग्णांना ३० दिवसांहून अधिक काळापासून ही लक्षणे असल्याचे समोर आले.
या परिसरातील ९० टक्के नागरिक बोअरवेलचे पाणी वापरत असल्याचे, तर २४.४ टक्के नागरिकांनी पाण्याला पिवळसर रंग असल्याचे सांगितले. संशयास्पद पाण्याचा वापर टाळल्यानंतर ५० टक्क्यांहून अधिक नागरिकांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची नोंद अहवालात आहे. विशेष म्हणजे, आठ रुग्णांच्या त्वचेच्या बायोप्सी तपासणीत दाहक संपर्क त्वचारोग (इरिटंट कॉन्टॅक्ट डर्माटायटिस) आढळला आहे. त्यामुळे औद्योगिक परिसरातील भूजल प्रदूषण आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
Source: Pudhari News