मालेगाव : शेतातील झाडावरून अवघी तीन-चार बोरं तोडून खाल्ल्याच्या कारणावरून दोन अल्पवयीन मुलींना शिवीगाळ करत मारहाण केल्याची संतापजनक घटना मालेगाव तालुक्यातील काष्टी येथे घडली आहे. यावेळी एका मुलीच्या जोरदार कानशिलात लगावल्याने ती रस्त्याच्या खाली असलेल्या खड्ड्यात जाऊन पडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणातील संशयित शेतकरी वसंत दगा हिरे (वय 65) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नेमकी घटना काय ?
मालेगाव-नामपूर रस्त्यावरील कृषी महाविद्यालयालगत असलेल्या काष्टी परिसरात वसंत हिरे यांचे शेत आहे. शेताच्या बांधावर बोरांची झाडे आहेत. एका महिलेसोबत दोन अल्पवयीन मुली या रस्त्याने जात असताना त्यांना झाडावरील बोरं दिसली. त्यांनी काही बोरं तोडून खाण्यास सुरुवात केली. मात्र, हा प्रकार शेतमालक वसंत हिरे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी धावत येऊन मुलींना शिवीगाळ आणि दमदाटी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोघींनाही मारहाण करण्यात आली. यावेळी एका मुलीच्या जोरात कानशिलात लगावल्याने ती रस्त्याच्या खाली फेकली जाऊन खड्ड्यात पडली. (Nashik Crime)
https://www.prahaar.in/2026/11/28/a-schoolgirl-was-assaulted-after-she-plucked-jujube-fruits-from-a-farm-sparking-an-uncontrollable-outburst-of-rage-from-the-farm-owne/
नागरिकांनी जाब विचारला, तरी दमदाटी
मुलींना मारहाण होत असल्याचे पाहून काही नागरिकांनी घटनास्थळी थांबत शेतकऱ्याला जाब विचारला. मात्र, त्यांनाही दमदाटी करत ‘जे करायचे ते करून घ्या’, असे उत्तर दिल्याचे समोर आले आहे. यावेळी एका सामाजिक कार्यकर्त्याने संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये चित्रित केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर घटनेचा सर्व स्तरांतून निषेध केला जात आहे.
संशयित शेतकरी पोलिसांच्या ताब्यात
घटनेची माहिती मिळताच वडनेर-खाकुर्डी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांनी तातडीने कारवाई करत संशयित वसंत दगा हिरे याला ताब्यात घेतले. पोलीस शिपाई प्रशांत सोमवंशी यांच्या तक्रारीवरून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मारहाणीला बळी पडलेल्या दोन्ही मुली आणि त्यांच्या आईचा पोलीस शोध घेत आहेत. मुली सापडल्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
विविध संघटनांकडून कठोर कारवाईची मागणी
या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. संबंधित शेतकऱ्यावर कठोर कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीसह विविध संघटनांनी दिला आहे. दरम्यान, संशयित शेतकऱ्याने हा प्रकार चुकून घडल्याचे सांगत पोलिसांकडे दिलगिरी व्यक्त केल्याची चर्चा आहे. मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.अवघ्या काही बोरांसाठी दोन अल्पवयीन मुलींना मारहाण झाल्याच्या या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Source: Prahaar News
