Hashtagintro

Nashik Simhastha Flag Hoisting | सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्यात नगरसेवकांची अवहेलना

  • महापौरांनाही ध्वजस्तंभापासून ठेवले दूर

  • महासभेत विचारणार जाब

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनात जनप्रतिनिधींना विश्वासात न घेतल्याच्या आरोपानंतर आता ध्वजारोहण सोहळ्यातही महापौर, उपमहापौरांसह नगरसेवकांची अवहेलना झाल्याचा प्रकार समोर आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत झालेल्या ऐतिहासिक ध्वजारोहण सोहळ्यात नाशिकच्या प्रथम नागरिक महापौर हिमगौरी आहेर आडके यांना ध्वजस्तंभापासून दूर स्थान देण्यात आले.

१२० नगरसेवकांसाठी करण्यात आलेली आसनव्यवस्थाही अडगळीच्या ठिकाणी असल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. याचे पडसाद मनपाच्या महासभेत उमटणार असून, प्रशासनासह कुंभमेळा प्राधिकरणाला जाब विचारण्याचा निर्धार नगरसेवकांनी केला आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. ३१) सिंहस्थ कुंभपर्वाचा ध्वजारोहनाने प्रारंभ झाला.

सोहळ्यासाठी दीड हजार व्हीआयपींसह मंत्री, खासदार, आमदार आणि नगरसेवकांना निमंत्रित करण्यात आले होते. मनपाच्या १२० नगरसेवकांसाठी रामकुंड आणि गांधी तलावादरम्यान आसनव्यवस्था करण्यात आली होती. मात्र, या जागेसमोर मंदिर असल्याने ध्वजारोहण सोहळा स्पष्टपणे दिसत नव्हता.

त्यातच नगरसेवकांसाठी राखीव जागांवर काही साधू बसल्याने अनेकांना बसण्यासाठी जागाच उपलब्ध झाली नाही. यामुळे संतप्त नगरसेवकांनी आसनव्यवस्था सोडली. मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी मध्यस्थी करत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, नगरसेवकांचा रोष कायम राहिला. व्हीआयपी कक्षात प्रवेश देण्याची मागणीही पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव नाकारली. अखेर गांधी ज्योत येथे प्रवेश मिळाल्यानंतरही खुर्च्यांची संख्या अपुरी असल्याने काही नगरसेवकांना उभे राहूनच सोहळा पाहावा लागला.

महापौरांना अंतरावर स्थान

महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी सोहळ्याला उपस्थित राहून मंत्री आणि व्हीआयपींचे स्वागत केले. मात्र, प्रत्यक्ष ध्वजारोहणावेळी राष्ट्रपतींसोबत ध्वजस्तंभाजवळ उभे राहण्याची संधी त्यांना मिळाली नाही. राष्ट्रपती, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांना अग्रस्थान देण्यात आले. महापौरोंना दूर ठेवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

मुद्दा महासभेत गाजणार

काही नगरसेवकांना व्हीव्हीआयपी कक्षातील पहिल्या रांगेत स्थान मिळाल्याने दुजाभावाचा आरोप करण्यात आला. सिंहस्थासारख्या ऐतिहासिक सोहळ्यात जनप्रतिनिधींना सन्मानजनक वागणूक मिळाली नसल्याची भावना नगरसेवकांनी व्यक्त केली. हा मुद्दा महासभेत उपस्थित करून प्रशासन आणि कुंभमेळा प्राधिकरणाकडून खुलासा मागितला जाणार असल्याने महासभेत हा विषय गाजण्याची शक्यता आहे.

बग्गा, शिंदेंचा पोलिसांशी वाद ज्येष्ठ नगरसेवक गुरुमीत बग्गा यांनी रामकुंडामोरील व्हीआयपी कक्षात प्रवेश करून आसनस्थ होण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा कक्ष व्हीव्हीआयपींसाठी राखीव असल्याचे सांगत पोलिसांनी त्यांना रोखले. यावरून बग्गा आणि पोलिसांत वाद झाला. कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी मध्यस्थी केल्यानंतर त्यांना प्रवेश मिळाला. उपमहापौर विलास शिंदे यांचीही ध्वजस्तंभाजवळील उपस्थितीवरून सुरक्षा यंत्रणांशी वाद झाल्याचे समोर आले.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language