Hashtagintro

Nevasa Sugarcane Transportation Protest: जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला कारखानदारांची केराची टोपली; प्रहारने अडविल्या ऊस वाहतूक करणाऱ्या गाड्या

नेवासा: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, तसेच सर्वपक्षीय शेतकरी नेत्यांनी सोमवारी (दि. २३) काढलेल्या मोर्चानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व साखर कारखानदारांना ऊस तोडणी व गाळपाबाबत आदेश दिले असतानाही, मंगळवारी (दि. २४) दुपारी ४ ते ५च्या दरम्यान ऊस वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून कारखानदारांकडून ऊस वाहतूक सुरूच ठेवल्याचा आरोप करत प्रहार सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कारखानदारांचा तीव्र निषेध व्यक्त केला.

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असतानाही कारखानदारांकडून त्याची अंमलबजावणी होत नसेल, तर प्रशासनाच्या आदेशाला किंमत काय? असा संतप्त सवाल प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून मनमानी पद्धतीने ऊस वाहतूक सुरू ठेवणाऱ्या कारखानदारांनी तातडीने वाहतूक बंद करावी, अशी मागणी करण्यात आली. जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांकडून ऊसतोडणी सुरूच असल्याचे निदर्शनास आल्याने ‘प्रहार’च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संभाजीनगर महामार्गावरील नेवासा फाटा येथे ऊस वाहतूक करणाऱ्या सर्व गाड्या थांबविल्या.

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असतानाही कारखानदारांकडून ऊसतोडणी सुरू ठेवली जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, प्रशासनाने या प्रकाराची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. या वेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर सांगळे, जिल्हा संपर्कप्रमुख बाळासाहेब खर्जुले, युवक जिल्हाध्यक्ष विधीज्ञ पांडुरंग औताडे, तालुकाप्रमुख जालिंदर आरगडे, तसेच दिलीप पोटे यांनी मनोगत व्यक्त केले.

या वेळी युवक जिल्हाध्यक्ष विधीज्ञ पांडुरंग औताडे यांनी आक्रमक भूमिका मांडताना सांगितले की, जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतरही कारखानदारांकडून ऊस वाहतूक सुरू ठेवली जात असेल, तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. प्रशासनाच्या आदेशाचा आदर करून त्याची अंमलबजावणी करणे कारखानदारांची जबाबदारी आहे. शेतकऱ्यांच्या घामाला योग्य मोबदला मिळालाच पाहिजे. कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत प्रहारचा संघर्ष सुरूच राहणार असून, ऊसदर जाहीर झाल्याशिवाय माघार नाही. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश पाळा, नाहीतर गाड्या फोडणारच, असा आक्रमक इशारा युवक जिल्हा उपाध्यक्ष सचिन साबळे, युवक जिल्हा संघटक संदीप पाखरे, अरविंद आरगडे, तालुका कार्याध्यक्ष अनिल विधाटे, तालुका उपाध्यक्ष पांडुरंग नवले, शहराध्यक्ष विशाल शिरसाठ, शेतकरी मारुती विधाटे, राजेंद्र कळसकर, नागनाथ आगळे, युवक तालुकाप्रमुख विकास कोतकर व सर्व शेतकऱ्यांतर्फे देण्यात आला.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language