न्यूयॉर्क : जगातील सर्वात मोठी चिप कंपनी ‘एनव्हिडिया’चे सीईओ जेन्सन हुआंग यांच्या ‘हनी ट्रॅप’ प्रकरणाने गदारोळ उठलेला असतानाच आता ‘टेलिग्राम’चे सीईओ पाॅवेल डुरोव यांनी या प्रकरणाशी संबंधित खिल्ली उडवणारी पोस्ट करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘माझ्यासाठी कुणी हेर पाठवली नाही, हा अन्याय आहे,’ अशी कॉमेंट करणार्या डुरोव यांच्या सोशल मीडिया पोस्टवर सध्या प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.
पाॅवेल डुरोव यांची ही पोस्ट आतापर्यंत २ मिलियनहून अधिक लोकांनी पाहिली असून, त्यावर मजेशीर कमेंटस्ही येत आहेत. पाॅवेल डुरोव यांनी गुरुवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास एक मजेशीर ट्विट केले. यात त्यांनी लिहिले, ‘हा अन्याय आहे की, ज्या सीईओंना आशियाई मुली आवडत नाहीत, त्यांना गुप्तचर संस्था डेटिंगचे कमी पर्याय देतात. फ्रेंच/रशियन/इरॅनिअन हनीपॉट कुठे आहेत? माझ्याकडे कोणतीही हनी ट्रॅपवाली मुलगी का पाठवली गेली नाही? ते लोक प्रयत्न तरी करत आहेत का?’ फ्रान्सची गोष्ट वेगळी आहे; कारण तेथील निर्णय घेणाऱ्यांना मुली आवडत नाहीत; पण इतर एजन्सींनी थोडी आणखी मेहनत घेतली पाहिजे, असा टोलाही डुरोव यांनी मारला आहे.
Unfair that CEOs who aren’t into Asian girls get fewer dating options from spy agencies.
Where are the French/Russian/Iranian honeypots? Not one spy girl sent my way. Are they even trying?
France is excused — their decision-makers aren’t into girls. Everyone else: try harder!
— Pavel Durov (@durov) November 11, 2026
हुआंग यांच्या ‘हनी ट्रॅप’ प्रकरणाकडे इशारा
‘एनव्हिडिया’चे सीईओ जेन्सन हुआंग यांचे ॲलिस हुआंग नावाच्या कथित चिनी हेरासोबतचे प्रेमप्रकरण समोर आल्यानंतर डुरोव यांनी हे ट्विट केल्याने चर्चेचा विषय बनले आहे. दरम्यान, जेन्सन यांचे हे दुसरे प्रेमप्रकरण असून, या खुलाशाानंतर ‘एनव्हिडिया’चे प्रशासन मंडळ जेन्सन यांना सीईओपदावरून हटवण्याच्या पूर्ण तयारीत असल्याचे वृत्त आहे.
ॲलिस बीजिंगला फरार
जेन्सन हुआंग यांनी प्रेमप्रकरण कबूल केल्यानंतर आणि प्रशासन मंडळाने हेरगिरीची चौकशी सुरू केल्यापासून गायब असलेली ॲलिस हुआंग आता अमेरिकेला गुंगारा देऊन चीनमध्ये परत पळून गेली असल्याचे ‘ब्लूमबर्ग’च्या अहवालात म्हटले आहे. चिनी सुरक्षा अधिकाऱ्यांना ॲलिस बीजिंगमध्ये असल्याची पूर्ण माहिती आहे; परंतु चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने या मुद्द्यावर पूर्णपणे मौन बाळगले आहे.
Source: Pudhari News
