OTT Web Series: ओटीटीवर दर आठवड्याला वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होत असतात. काही सीरिज आपल्या मनोरंजक कथेमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात, तर काही रहस्य आणि थरारामुळे चर्चेत येतात. सध्या अशाच एका मिस्ट्री-थ्रिलर वेब सीरिजची चर्चा रंगली आहे.
अवघ्या सहा एपिसोडमध्ये प्रेक्षकांना रहस्य, संशय, तपास आणि अनपेक्षित वळणांचा अनुभव देणारी ही सीरिज म्हणजे 'स्टुडंट ऑफ द इयर 2 : आफ्टर डार्क'. ही सीरिज जिओ हॉटस्टारवर उपलब्ध असून अभिनेत्री शनाया कपूर यात महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. या सीरिजची कथा एका श्रीमंत शाळेतील जुळ्या बहिणींच्या आयुष्याभोवती फिरते.
आयशा आणि अदिती या जुळ्या बहिणींपैकी आयशाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू होतो. तिच्या मृत्यूमागचं नेमकं कारण काय, तिच्यासोबत त्या रात्री काय घडलं आणि या घटनेला जबाबदार कोण, असे अनेक प्रश्न निर्माण होतात. याच प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी अदिती त्याच शाळेत प्रवेश घेते. सुरुवातीला तिचा संशय आयशाच्या पाच मित्रांवर जातो. मात्र, सत्य शोधण्यासाठी ती हळूहळू त्यांच्याच ग्रुपचा भाग बनते. तपासादरम्यान तिच्यासमोर अनेक संशयित चेहरे येतात.
कथेतील फ्लॅशबॅक आणि वर्तमानकाळातील घटनांमुळे प्रेक्षकांना प्रत्येक पात्राकडे वेगळ्या नजरेने पाहावं लागतं. सुरुवातीला ज्याच्यावर संशय येतो, तोच खरा गुन्हेगार असेलच असं नाही. विशेष म्हणजे, ज्या व्यक्तीवर अदितीचा सर्वात कमी संशय असतो, तीच अखेरीस या संपूर्ण कटामागील सूत्रधार निघते, असा कथेत मोठा ट्विस्ट आहे.
'स्टुडंट ऑफ द इयर २ : आफ्टर डार्क' ही सहा एपिसोडची मिस्ट्री-थ्रिलर सीरिज जिओ हॉटस्टारवर पाहता येईल. या सीरिजमध्ये शनाया कपूरने आयशा आणि अदिती या जुळ्या बहिणींची दुहेरी भूमिका साकारली आहे. तिच्यासोबत दिविक शर्मा, अभिनव सिंह, मान्या ग्रोवर, आदि मलिक, अभिषेक खान, शीबा चड्ढा, खालिद सिद्दीकी, नीरज काबी आणि विवेक गोम्बर हे कलाकारही दिसतात.
Source: TV9 Marathi National





