सोलापूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला आता गती मिळाली असून, कॉरिडॉरसाठी भूसंपादनाची अधिसूचना सोमवारी दि. १९ ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आली आहे. आज, मंगळवार, दि. २० ऑक्टोबरपासून वाटाघाटीद्वारे जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली.
भूसंपादनासाठी पहिल्या टप्प्यात १०० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, संपूर्ण कॉरिडॉरच्या भूसंपादनासाठी सुमारे १,५०० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. जसजसे भूसंपादन होईल, तसतसा शासनाकडून निधी प्राप्त होईल, असेही जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी सांगितले.
पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी वर्षभर लाखो भाविक येतात. आषाढी आणि कार्तिकी यात्रांच्या काळात भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरातील सुविधा, भाविकांची ये-जा, वाहतूक व्यवस्थापन आणि परिसराच्या नियोजनबद्ध विकासासाठी कॉरिडॉर प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. पंढरपूर कॉरिडॉर हा पूर्ण प्रकल्प तीन हजार ८०० कोटी रुपयांचा आहे. यात बाधित होणाऱ्यांना घरांएवेजी घर, दुकानाऐवजी दुकान, शिवाय मोबदलाही दिला जाणार आहे, असे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी सांगितले.
भूसंपादनाची अधिसूचना जारी झाल्याने प्रकल्पाच्या अंमलबजावणीतील महत्त्वाचा टप्पा पुढे सरकला आहे. २० ऑक्टोबरपासून संबंधित जमीनधारकांशी वाटाघाटी करून जमीन संपादनाची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात उपलब्ध झालेल्या १०० कोटी रुपयांच्या निधीतून भूसंपादनाला सुरुवात होणार असल्याने येत्या एप्रिल २०२७ पर्यंत भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होईल, अशी शक्यता आहे.
Source: Pudhari News
