Hashtagintro

Pimpri Chinchwad Swachh Survekshan: स्वच्छतेच्या राष्ट्रीय स्पर्धेत पिंपरी-चिंचवडचा डंका! स्वच्छ सर्वेक्षणातील क्रमांकाची आज उत्सुकता

पिंपरी: स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी शहराच्या निर्मितीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेकडून राबविण्यात येत असलेल्या सातत्यपूर्ण स्वच्छता उपक्रमांची आणि प्रभावी स्वच्छता व्यवस्थापनाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. स्वच्छ सर्वेक्षणातील महापालिकेच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे शहराच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे.

प्रशासकीय नियोजन, विविध विभागांमधील समन्वय, स्वच्छता सेवकांचे अथक परिश्रम आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे नागरिकांचा सक्रिय सहभाग या सामूहिक प्रयत्नांच्या बळावर शहराने स्वच्छतेच्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. स्वच्छ सर्वेक्षणाचे दिल्ली येथे बुधवारी (दि. 11) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. त्या कार्यक्रमात पिंपरी चिंचवड शहराचा कितवा क्रमांक आला हे जाहीर केले जाणार आहे. महापौर रवी लांडगे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम आणि उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरात स्वच्छतेविषयक विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत.

कचरा विलगीकरण, ओला व सुका कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, जनजागृती मोहिमा, पुनर्वापर आणि पुनर्चक्रीकरणाला प्रोत्साहन देणारी आरआरआर केंद्रे तसेच, पर्यावरणपूरक संकल्पनांच्या माध्यमातून शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर भर दिला जात आहे. केवळ स्वच्छता मोहीम राबविण्यापुरते मर्यादित न राहता नागरिकांच्या दैनंदिन सवयींमध्ये स्वच्छतेविषयीची जाणीव निर्माण करणे, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी लोकसहभाग वाढविणे आणि स्वच्छतेला सामूहिक जबाबदारीचे स्वरूप देणे, या उद्देशाने आरोग्य विभागाकडून विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहेत. यामध्ये स्वच्छता सेवक, स्वयंसेवी संस्था, गृहनिर्माण संस्था आणि नागरिकांचा सहभाग महत्त्वपूर्ण ठरत आहे.

महापालिकेच्या विविध विभागांचा समन्वय ठरतोय यशाचा आधार

शहराच्या स्वच्छता व्यवस्थेला सक्षम आणि परिणामकारक स्वरूप देण्यात महापालिकेच्या विविध विभागांचे योगदानही तितकेच मोलाचे आहे. आरोग्य विभागासोबतच जलनिस्सारण, पाणीपुरवठा, स्थापत्य, विद्युत, पर्यावरण आणि उद्यान विभागांनी परस्पर समन्वयातून स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, सार्वजनिक सुविधांची देखभाल आणि शहराच्या पायाभूत व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. विविध विभागांनी आपापल्या कार्यक्षेत्रात केलेल्या नियोजनबद्ध कामामुळे स्वच्छता व्यवस्थेला अधिक व्यापक आणि परिणामकारक स्वरूप प्राप्त झाले आहे. यासोबतच सहायक आरोग्य अधिकारी, मुख्य आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक आणि सफाई सेवक यांनी क्षेत्रीय स्तरावर केलेले नियोजन, नियमित देखरेख आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीतील योगदान या यशाचा महत्त्वाचा आधार ठरले आहे. शहराच्या कानाकोपऱ्यात स्वच्छता राखण्यासाठी प्रत्यक्ष मैदानावर कार्यरत असलेल्या सफाई सेवकांचे परिश्रम विशेष उल्लेखनीय आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण कामामुळे शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम होत आहे.

नागरिकांचा सहभाग हीच स्वच्छतेच्या यशाची खरी ताकद

महापालिकेच्या प्रयत्नांना नागरिकांच्या सक्रिय सहभागाची जोड मिळाल्याने स्वच्छता अभियानाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. कचऱ्याचे योग्य विलगीकरण, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे, पुनर्वापराला प्रोत्साहन देणे, पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये सहभागी होणे आणि स्वच्छतेविषयी इतरांमध्ये जागरूकता निर्माण करणे अशा विविध माध्यमांतून नागरिक आपले योगदान देत आहेत. प्रशासनाचे नियोजन, विविध विभागांमधील समन्वय, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे परिश्रम आणि नागरिकांची स्वच्छतेप्रती असलेली जबाबदारीची भावना या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतूनच शहराच्या स्वच्छता व्यवस्थेला अधिक बळ मिळत आहे, असे उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी सांगितले.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language