Hashtagintro

Pouched Animals in Australia | ऑस्ट्रेलियात पिशवी असणाऱ्या प्राण्यांची संख्या जास्त का?

सिडनी / लंडन : कांगारू, कोआला आणि वोम्बॅट यांसारख्या आपल्या शरीरावरील पिशवीत पिलांना वाढवणाऱ्या सस्तन प्राण्यांचे (Marsupials) ऑस्ट्रेलिया हे मुख्य घर मानले जाते. या खंडात अशा प्राण्यांची संख्या प्रचंड असल्याने एक स्वाभाविक प्रश्न पडतो, या वैशिष्ट्यपूर्ण प्राण्यांची उत्पत्ती ऑस्ट्रेलियातच झाली आहे का? उत्क्रांती जीवशास्त्राच्या संशोधकांनी या प्रश्नाचे थेट आणि स्पष्ट शब्दांत नकारार्थी उत्तर दिले आहे. ब्रिटनमधील साल्फोर्ड विद्यापीठातील उत्क्रांती जीवशास्त्राचे प्राध्यापक रॉबिन बेक यांच्या मते, ऑस्ट्रेलियात पोहोचण्यापूर्वी हे प्राणी पृथ्वीवर किमान ७ कोटी वर्षांपासून अस्तित्वात होते. ‘हे सस्तन प्राणी मूळचे ऑस्ट्रेलियातील अजिबात नाहीत. ते तिथे स्थलांतरित होऊन आलेले आहेत,’ असा खुलासा बेक यांनी केला आहे.

मानव, कुत्रे किंवा देवमाशांप्रमाणे पूर्ण विकसित पिलांना जन्म देणाऱ्या सस्तन प्राण्यांपेक्षा हे वेगळे असतात. या प्राण्यांची पिले अत्यंत अपूर्ण किंवा अविकसित अवस्थेत जन्माला येतात. जन्मानंतर ती सरपटत आईच्या शरीरावरील पिशवीत जातात आणि तिथे स्तनाग्राला चिकटून राहतात. अनेक महिने आईचे दूध पिऊन ती तिथेच पूर्ण वाढतात. प्राध्यापक बेक यांच्या मते, या प्राण्यांच्या पूर्वजांचे सर्वात जुने जीवाश्म चीनमध्ये सापडले आहेत, जे सुमारे १२ कोटी वर्षांपूर्वीच्या ‘अर्ली क्रेटेशियस’ काळातील आहेत. यावरून असे स्पष्ट होते की, सामान्य सस्तन प्राणी आणि पिशवी असणारे प्राणी यांच्यातील विभाजन या काळाच्या आधी उत्तर गोलार्धात कुठेतरी झाले असावे. प्राचीन काळात उत्तर अमेरिका, युरोप आणि आशिया यांचा मिळून बनलेल्या ‘लॉरेशिया’ या महाखंडात हे प्राणी मोठ्या प्रमाणावर बहरले.

संशोधनात या प्राचीन प्राण्यांच्या ७० हून अधिक प्रजाती आढळल्या आहेत, ज्या आता नामशेष झाल्या आहेत. सुमारे ६.६ कोटी वर्षांपूर्वी, जेव्हा पृथ्वीवरून डायनासोर नष्ट झाले, त्या काळात हे प्राणी दक्षिण अमेरिकेकडे सरकले. त्यावेळी उत्तर आणि दक्षिण अमेरिका आजच्यासारखे जोडलेले नव्हते; मात्र त्यांच्यातील अंतर खूप कमी होते आणि नैसर्गिक जमिनीचा पूल किंवा बेटांच्या साखळीमुळे प्राण्यांना एका खंडातून दुसऱ्या खंडात जाणे शक्य झाले. दक्षिण अमेरिकेत पोहोचल्यानंतर अवघ्या २० ते ३० लाख वर्षांत या प्राण्यांच्या उत्क्रांतीने मोठी झेप घेतली. त्यांच्यामध्ये प्रचंड विविधता निर्माण झाली. काही प्रजाती अस्वलासारख्या आणि मुंगूससदृश मांसाहारी बनल्या, काहींना भक्ष्याला फाडण्यासाठी धारदार सुळे फुटले, तर काहींनी फळे आणि बिया खाण्यासाठी स्वतःमध्ये अनुकूल बदल घडवून आणले. दक्षिण अमेरिकेतूनच पुढील काळात या प्राण्यांचा प्रवास अंटार्क्टिकामार्गे अखेर ऑस्ट्रेलियाच्या दिशेने झाला.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language