Hashtagintro

Prakash Abitkar | जि. प. सदस्यांना वाढीव निधी देण्याबाबत फेरविचार करू : पालकमंत्री आबिटकर

कोल्हापूर : जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा परिषदेला मिळालेल्या २५४ कोटी रुपयांच्या निधीच्या वाटपावरून आमदार विरुद्ध जिल्हा परिषद सदस्य यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाला सोमवारी रात्री पुन्हा तोंड फुटले. निधी वाटपात सदस्यांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करत ५१ सदस्यांनी वाढीव निधीची जोरदार मागणी केली. सदस्यांच्या आक्रमक भावना लक्षात घेऊन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी निधी वाटपाच्या सूत्राचा फेरविचार करून आणखी वाढ करता येईल का, याची तपासणी करू. दोन दिवसांत सकारात्मक निर्णय देऊ, असे आश्वासन दिले.

रेसिडेन्सी क्लब येथे महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, जनसुराज्यचे आमदार विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके, राहुल आवाडे, राजेंद्र पाटील-यड्रावकर, अशोकराव माने यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत, उपाध्यक्ष तानाजी खोत, शिक्षण व अर्थ समिती सभापती शीतल यादव, बांधकाम सभापती सारिका नांदेकर, समाजकल्याण सभापती श्रद्धा गायकवाड, महिला बालकल्याण समिती विद्या पाटील यांच्यासह गटनेते उपस्थित होते.

जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात ७० टक्के आणि ३० टक्के असे सूत्र राज्यभरात महायुतीने निश्चित केले आहे. या सूत्रात काही प्रमाणात बदल करून आपण निधीचे वाटप केले आहे. तरीही सदस्यांच्या भावना तीव्र असल्याने आणखी वाढ करता येईल का, याचा विचार करू, असे आबिटकर यांनी स्पष्ट केले.

बैठकीत संग्रामसिंह कुपेकर यांनी सदस्यांच्या भूमिकेची बाजू मांडली. जिल्हा परिषद सदस्यांचे मतदारसंघ व्यापक असून नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे सदस्यांना अधिकाधिक निधी मिळणे आवश्यक आहे. मात्र, निधी वाटप करताना त्यांच्या अधिकारांवर गदा येता कामा नये. चुकीचे पायंडेही पडू नयेत, अशी भूमिका त्यांनी मांडली. अतिश शिंगे, अमरिश घाटगे, प्रकाश मुंगडे यांच्यासह अन्य सदस्यांनीही वाढीव निधीसाठी आग्रह धरला.

आमदार विरुद्ध सदस्य संघर्षाची कोंडी कायम

जिल्हा परिषद निधी वाटपाचा वाद अनेक दिवसांपासून सुरू आहे. आमदारांच्या मतदारसंघनिहाय प्रभावामुळे सदस्यांच्या विकासकामांसाठी निधी कमी पडत असल्याची तक्रार करत सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर निधी वाटपात नेमकी किती वाढ होते आणि सदस्यांच्या नाराजीवर तोडगा निघतो का, याकडे लक्ष लागले आहे.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language