Hashtagintro

Pudhari Event: उद्या मुंबईत देवकी पंडित, तर विरारमध्ये पं. अजित कडकडेंची मैफल

मुंबई: दिवाळीच्या निमित्ताने पुढारीच्या वतीने ज्येष्ठ शास्त्रीय गायिका देवकी पंडित आणि गायक पं. अजित कडकडे यांच्या स्वरमैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. गायिका देवकी पंडित यांच्या स्वरांची सांगीतिक मैफल बुधवार ४ नोव्हेंबर रोजी दादर येथील शिवाजी नाट्य मंदिरात दुपारी ४ वाजता होणार आहे.

पं. अजित कडकडे यांच्या स्वरमैफलीचा आनंद सोमवार ९ नोव्हेंबर रोजी विरारमधील रसिकांना घेता येणार आहे. ही मैफल विरार पूर्वमधील विवांता हॉटेल येथे दुपारी ४ वाजता रंगणार आहे.

गेल्या ३ वर्षांपासून पुढारीच्या वतीने रसिकांसाठी स्वरमैफलीचे आयोजन करण्यात येत आहे. या मैफलींना रसिकांचा मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता यंदाही पुढारीच्या वतीने देवकी पंडित आणि अजित कडकडे यांच्यासारख्या ज्येष्ठ शास्त्रीय गायकांच्या मैफलीची मेजवानी रसिकांना देण्याचे ठरवले आहे.

पं. वसंतराव कुलकर्णी, विदुषी किशोरी अमोणकर, पं. जितेंद्र अभिषेकी, बबनराव हळदणकर आणि आपली आई उषा पंडित यांच्याकडे गायनाचे धडे गिरविणाऱ्या देवकी पंडित या स्वर आणि शब्दप्रधान गायकीसाठी प्रसिद्ध आहेत.

शास्त्रीय संगीताबरोबरच सुगम गायनावरही त्यांनी आपले स्वर कोरले आहेत. त्यामुळे रागदारी, पार्श्वगायन, मालिकांची शीर्षकगीते या सगळ्यांवर त्यांनी आपल्या स्वरकोंदणांचा अवीट ठसा उमटवला आहे.

स्वरांवर हुकुमत असलेल्या देवकीताईंच्या स्वरांचा नजराना पुढारीच्या दिवाळी संध्येच्या निमित्ताने ऐकण्याची पर्वणी रसिकांना मिळणार आहे. ही स्वरमैफल दादरच्या शिवाजी नाट्य मंदिरात दुपारी ४ ते रात्रौ ८ या वेळेत रंगणार आहे.

भावगीते, भक्तिगीते, अभंग, नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीतात अमूल्य योगदान असणारे ज्येष्ठ गायक तसेच पं. जितेंद्र अभिषेकी आणि पं. गोविंदप्रसाद जयपूरवाले यांच्याकडे गायनाचे शिक्षण घेतलेले पं. अजित कडकडे यांच्या भावमैफलीचा आनंद विरारमधील रसिकांना घेता येणार आहे. ही मैफल सोमवार ९ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता होणार आहे.

दिवाळीनिमित्त पुढारी आयोजित स्वरमैफल रसिकांसाठी विनामूल्य आहेत.

  • शास्त्रीय गायिका देवकी पंडित मैफल

  • बुधवार ४ नोव्हेंबर २०२६

  • दुपारी ४ ते रात्रौ ८

  • स्थळ- शिवाजी नाट्य मंदिर, दादर

प्रसिध्द गायक पं. अजित कडकडे मैफल

सोमवार ९ नोव्हेंबर २०२६, दुपारी ४ ते रात्रौ ८

स्थळ – हॉटेल विवांता, विरार पूर्व, जि. पालघर

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language