रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश यांच्या मुख्य भूमिका असलेला 'रामायण' चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच बॉक्स ऑफिसवर चर्चेत आला आहे. चित्रपटाची अॅडवान्स बुकिंग सुरू असून भारतासह परदेशातही प्रेक्षकांकडून या सिनेमाला मोठी पसंती मिळत आहे. विशेष म्हणजे चित्रपट रिलीज होण्याआधीच त्याने 40 कोटींच्या कमाईचा आकडा पार केला आहे.
31 ऑक्टोबरच्या आकडेवारीनुसार भारतात या चित्रपटाने अॅडवान्स बुकिंगमध्ये 16.5 कोटी रूपयांचा ग्रॉस व्यवसाय केला. या काळात तीन लाखांहून अधिक तिकिटांची विक्री झाली. देशभरात या चित्रपटाचे जवळपास 2,500 स्क्रिन मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. सुरूवातीला हिंदी भाषेतील 'शो' ची बुकिंग मोठ्या प्रमाणात सुरू होती. मात्र आता कन्नड, तेलुगु आणि तमिळ भाषांमधील शोदेखील वाढत्या प्रतिसादामुळे वाढवण्यात आले आहेत.
कन्नड भाषेतील चित्रपटाला मिळणारा प्रतिसादही लक्षवेधी आहे. या आवृत्तीचा भारतातील एकूण अॅडवान्स बुकिंगमध्ये सुमारे 13 टक्के वाटा असल्याची माहिती आहे. यामागे चित्रपटात रावणाची भूमिका साकारणाऱ्या यशची लोकप्रियताही महत्त्वाची ठरत असल्याचं सांगितलं जातं आहे.
परदेशातील बुकिंगमुळेही चित्रपटाच्या कमाईत भर पडली आहे. उत्तर अमेरिकेत 4 नोव्हेंबरच्या संध्याकाळी पेड प्रिव्ह्यू शो ठेवण्यात आले आहेत. लॉस एंजेलिसमध्ये झालेल्या वर्ल्ड प्रीमियरनंतर परदेशातील अॅडवान्स बुकिंगमध्ये वाढ झाल्याचं वृत्त आहे. हीच बुकिंग 31 ऑक्टोबरपर्यंत 2.5 दशलक्ष डॉलरच्या आसपास पोहोचली आहे. त्यामुळे जगभरातील कमाईचा आकडा 40 पार गेला आहे.
नितेश तिवारी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. रणबीर कपूर श्री रामाच्या भूमिकेत, साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत, तर यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय सनी देओल हनुमान आणि रवि दुबे लक्ष्मणाची भूमिका साकारणार आहेत.
'रामायण : पार्ट वन' हा चित्रपट 5 नोव्हेंबर 2026 रोजी हिंदी, तमिळ,तेलूगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मात्र अॅडवान्स बुकिंगमधील ही कमाई प्रदर्शनापूर्वी विकल्या गेलेल्या तिकिटांचा आकडा आहे.
Source: TV9 Marathi Entertainment






