Hashtagintro

Ratnagiri Hapus : दिवसा ऊन, रात्री थंडी; हापूससाठी आशेचा किरण

रत्नागिरी :‘अल निनो’च्या प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने उन्हाची तीव्रता वाढली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून उन्हाच्या झळा सोसणाऱ्या कोकणातील आंबा बागायतदारांना गेल्या चार-पाच दिवसांतील हवामानातील बदलामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. दिवसा कडकडीत ऊन आणि रात्री जाणवणारा गारठा असे वातावरण सध्या अनुभवायला मिळत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सुमारे ९० ते ९५ आंबा झाडांना पालवी आली असून, मोहोरासाठी आता पोषक थंडीची प्रतीक्षा आहे. त्यामुळे यंदाचा आंबा हंगाम काहीसा उशिरा सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

आंबा उत्पादन मिळावे, यासाठी संजीवकांचा वापर करूनही अपेक्षित परिणाम झालेला नाही. बहुतांश झाडांना पालवी फुटल्याने ती पूर्णपणे जून होण्यासाठी सुमारे ९० दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे या झाडांवर जानेवारी ते फेब्रुवारीदरम्यान मोहोर येण्याची शक्यता आहे. त्यासाठी या कालावधीत थंडीचे प्रमाण टिकून राहणे आवश्यक आहे. ‘एल निनो’च्या प्रभावामुळे पुन्हा उष्णतेचे प्रमाण वाढल्यास मोहोर प्रक्रियेवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो.

हापूसला संतुलित हवामान

फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा हापूस आंबा हवामानाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे. मोहोर येण्यापासून फळधारणा आणि फळांच्या वाढीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर विशिष्ट तापमानाची आवश्यकता असते. चांगला मोहोर येण्यासाठी सलग किमान सात दिवस १३ ते १४ सेल्‍सिअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान पोषक ठरते. तर फळधारणेसाठी २४ ते ३० अंश सेल्सिअस तापमान अनुकूल असते. या नैसर्गिक चक्रात थोडासा बदल झाला तरी त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर आंबा बागायतदारांना मोहोराचे संरक्षण आणि कीड-रोग नियंत्रणाबाबत कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांकडून महत्‍वपूर्ण मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. शासनमान्य कीटकनाशके, फवारणीचे योग्य नियोजन आणि रोग नियंत्रणाच्या उपाययोजनांबाबत कृषी विभागाने मार्गदर्शन शिबिरे आयोजित करावीत, अशी अपेक्षा बागायतदारांकडून व्यक्त होत आहे.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language