Hashtagintro

Ratnagiri News : जिल्हा परिषदच्‍या १७१ शिक्षकांच्‍या बदल्‍या

रत्नागिरी : जिल्हा परिषद शिक्षण विभागातील शिक्षकांच्या बदल्यांचे फेर समायोजनानुसार एकूण १७१ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये वर्षानुवर्षे ग्रामीण भागात प्रामाणिक सेवा देऊन निवृत्तीच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या ५३ वर्षांवरील ज्येष्ठ शिक्षकांचाही समावेश करण्यात आला आहे. पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या विशेष प्रयत्नामुळे जुन्या शिक्षकांना न्याय मिळाला.

जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत सुरू असलेल्या शिक्षक बदल्यांमधील अनागोंदी कारभार पुढे आला होता. काही शिक्षक संघटनांच्या मनमानी कारभारामुळे निवृत्तीच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या ५३ वर्षांवरील ज्येष्ठ शिक्षकांना दूरवरच्या दुर्गम शाळांमध्ये पाठवण्याच्या प्रशासकीय धोरणावर पालकमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या प्रकरणी अधिकाऱ्यांसह शिक्षक संघटनेची चांगलीच खरडपट्टी काढत त्यांनी सेवाज्येष्ठतेनुसार ज्येष्ठांना सोयीच्या शाळा उपलब्ध करून देण्याचे कडक निर्देश दिले होते. या निर्णयानंतर शिक्षण विभागाने १०३ अर्जांची छाननी पूर्ण झाली होती. परंतु त्यानंतर फेर समायोजन प्रक्रिया केल्याने यामध्ये बदली अर्ज वाढले होते. पालकमंत्री उदय सामंत यांनी ५३ वर्षांवरील आणि सेवानिवृत्तीच्या टप्प्यावर असलेल्या शिक्षकांचा सहानुभूतीपूर्वी विचार करून त्यांना सोयीच्या ठिकाणी नियुक्ती देण्याच्या स्पष्ट सूचना आधीच दिल्या होत्या. मात्र, शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या निर्देशांना बगल देत स्वतःची वेगळीच ‘व्यवस्था’ निर्माण केली होती. यामध्ये एका विशिष्ट शिक्षक संघटनेचाही मोठा दबाव आणला होता.

जिल्ह्यात आधीच हजाराहून अधिक शिक्षक अतिरिक्त असताना अचानक ४५० नवीन शिक्षकांच्या नियुक्तीचा घाट का घातला गेला? आणि भरतीनंतर जुन्या शिक्षकांचे समायोजन करताना वय, सेवा ज्येष्ठता आणि नियमांची पायमल्ली का केली गेली? असे खरमरीत सवाल पीडित शिक्षक वर्गातून उपस्थित केले जात होते. आयुष्याची ३०-३५ वर्षे सेवा दिल्यानंतर निवृत्तीच्या अवघ्या दोन वर्षे आधी दुर्गम भागात बदली करण्याच्या या अन्यायी कारभारामुळे शिक्षण विभागाची मोठी नाचक्की झाली होती. परंतु पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे आणि शिक्षण विभागाच्या झालेल्या बैठकीमध्ये अनेक प्रश्न निकाली काढण्यात आले. संघटनांचा दबाव आणि शिक्षण विभागाच्या कारभाराला फाटा देत अनेक दिवस रखडलेल्या शिक्षकांच्या बदल्यांचे घोडे अखेर गंगेत न्हाले. जिल्ह्यातील १७१ शिक्षकांच्या बदला प्रशासनाने केल्या. यामध्ये ५३ वर्षावरील ज्येष्ठ शिक्षकांनाही न्याय देण्यात आल्याने पालकमंत्री उदय सामंत यांचे शिक्षकांनी विशेष आभार मानले.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language