Hashtagintro

Ratnagiri News : मोरी बुजवून खासगी रस्ता बनवण्याचा घाट! ‌

रत्नागिरी : मिऱ्या-नागपूर (रत्नागिरी-कोल्हापूर) राष्ट्रीय महामार्गावरील हातखंबा तिठा येथे शासकीय बॉक्स मोरीच्या बोगद्यात माती टाकून पाण्याचा नैसर्गिक प्रवाह रोखल्याप्रकरणी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) जमीन मालक रणजीत अमित देसाई यांना नोटीस बजावली आहे. २९ ऑक्टोबर रोजी बजावलेल्या या नोटिसीत बेकायदेशीर काम तातडीने थांबवून मोरी पूर्ववत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, कारवाईवेळी विना नंबरप्लेटचा जेसीबी पळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या चालकाविरोधातील प्रकरण पोलिसांनी न्यायालयात पाठवले आहे. हातखंबा तिठ्यावरील कांबळे वस्तीच्या परिसरात हा प्रकार घडला. देसाई यांनी जेसीबीच्या साहाय्याने मोरीच्या बोगद्यात माती टाकून खासगी जागेत जाण्यासाठी रस्ता तयार करण्याचे काम सुरू केले होते. स्थानिक रहिवाशांनी विरोध केल्यानंतर दिवसा काम थांबवण्यात आले; मात्र रात्री पुन्हा माती टाकण्यात आल्याचा आरोप आहे.महामार्ग प्राधिकरणाने मोरीच्या परिसरात सुरक्षेच्या उपाययोजनेसाठी माती टाकली होती. त्याच मातीचा वापर करून मोरी बुजवण्यात आल्याचे नोटिशीत नमूद आहे. या प्रकारामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बाधित होऊन महामार्गाच्या पायाभूत सुविधांचे नुकसान आणि परिसरात पाणी साचण्याचा धोका निर्माण झाल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.

२९ ऑक्टोबर रोजी NHAIचे प्रतिनिधी अनिल सिंग, कनिष्ठ अभियंता ललित, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार कंपनीचे प्रतिनिधी आणि ठेकेदार कंपनीचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी जेसीबी चालक संतोष वासुदेव राठोड याने जेसीबी महामार्गावरून विरुद्ध दिशेने पळवण्याचा प्रयत्न केला. हातखंबा वाहतूक मदत केंद्राच्या पोलिसांनी पाठलाग करून चालकाला पकडले. वाहनावर ई-चलनाची कारवाई करण्यात आली असून, मोटार वाहन कायद्यानुसार प्रकरण न्यायालयात पाठवण्यात आले आहे.

या प्रकरणात महामार्गाचे काम करणाऱ्या रवी इन्फ्रा बिल्ड कंपनीच्या भूमिकेवरही स्थानिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. मोरी बुजवण्याचा प्रकार सुरू असताना कंपनीच्या गस्ती पथकाने वेळीच हस्तक्षेप का केला नाही, असा सवाल नागरिकांनी केला आहे. संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मात्र या प्रकरणात आपला संबंध नसल्याचे सांगितल्याचा दावा करण्यात आला आहे. मोरीच्या मुखाजवळ मातीचा ढीग अद्याप अर्धवट असल्याने तो पूर्णपणे हटवावा, स्थानिकांच्या सोयीसाठी उखडलेला बायपास रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी रहिवाशांनी केली. दरम्यान, जिल्हाधिकारी जिंदल यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत महसूल कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाहणीसाठी पाठवले होते. संबंधित यंत्रणांनी बेकायदेशीर कामावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देशही त्यांनी दिले होते.

NHAIचे प्रकल्प संचालक गोविंद पी. भैरव यांनी दिलेल्या नोटिसीची प्रत जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आली आहे. मोरी बुजवून वस्तीच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या प्रकाराची सखोल चौकशी करून जमीन मालकासह संबंधित कंत्राटदार कंपनीवरही कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language