Hashtagintro

Sangli Crime : रेड येथे ३५ लाखांची रोकड घरातून लंपास

शिराळा : रेड (ता. शिराळा) येथे जमिनीच्या व्यवहारासाठी घरातील कपाटात ठेवलेली ३५ लाख रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. घटना उघडकीस आली आहे. मंगळवार, ३ नोव्हेंबररोजी सायंकाळी पाचच्या सुमारास हा प्रकार निदर्शनास आला. गुरुवार, दि. २९ ऑक्टोबररोजी सायंकाळी सहा ते मंगळवार, दि. ३ नोव्हेंबररोजी सायंकाळी पाच या कालावधीत ही चोरी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

येथील महादेव बाबुराव जाधव (वय ५४) यांनी जमिनीच्या व्यवहारासाठी ३५ लाख रुपये घरात आणून लाकडी कपाटात ठेवले होते. दरम्यान, त्यांचा मुलगा सचिन यांच्या पायावर शस्त्रक्रिया करायची असल्याने त्यांना कराड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यामुळे ठरलेला जमिनीचा व्यवहार होऊ शकला नाही.

सचिन आणि त्यांची पत्नी शीतल हे शुक्रवारपासून कराड येथे असल्याने घर बंद होते. कपाटाची चावी शीतल यांनी सोबत नेली होती. मात्र, घरातील मांजराला खाद्य देण्यासाठी सचिन यांची मुलगी स्पृहा अधुनमधून घरी जात असे. यावेळी दिवसा घर उघडे ठेवले जात होते, तर रात्री बंद केले जात होते. मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास स्पृहा मांजराला खाद्य देण्यासाठी घरी गेली असता, तिला लाकडी कपाट उघडे आणि घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. तिने तत्काळ याबाबत आजोबा महादेव जाधव यांना माहिती दिली. त्यानंतर शिराळा पोलिसांना चोरीची कल्पना देण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक जंबाजी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सागर वरुटे, पोलिस उपनिरीक्षक आनंदराव जाधव व पोलिस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्रकरणाच्या तपासासाठी फॉरेन्सिक पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले असून, घटनास्थळावरून संशयास्पद ठसे घेतलेे आहेत. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language