Hashtagintro

Satara News : मायलेकींची पोटासाठी जीवघेणी धडपड

भास्कर धनावडे

मेढा : एकीकडे जग चंद्रावर पोहोचले, संगणकाच्या युगाने मानवी जीवनाला आधुनिकतेची नवी दिशा दिली, तंत्रज्ञानाच्या जोरावर माणूस प्रगतीची शिखरे सर करीत आहे. मात्र, याच आधुनिक जगात दुसरीकडे दोन वेळच्या जेवणासाठी अजूनही संघर्ष करणारा समाज अस्तित्वाची लढाई लढत आहे. मेढ्यातील कातकरी समाजातील माधुरी पवार आणि तिची मुलगी यांचे जीवन याचेच बोलके उदाहरण आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी या मायलेकी वेण्णा नदीच्या पात्रात होडी घेऊन जीव धोक्यात घालत मासेमारी करीत आहेत. त्यांच्या या संघर्षमय जीवनाचे चित्र पाहिले की, विकासाच्या गप्पा आणि प्रत्यक्ष वास्तवातील दरी प्रकर्षाने जाणवते.

मेढा-मोहाट पुलाजवळील वेण्णा नदीच्या पात्रात पाण्याच्या मध्यभागी होडी घेऊन माधुरी पवार आणि तिची मुलगी मासेमारी करताना दिसतात. नदीच्या पाण्याचा अंदाज घेत, होडीचा तोल सांभाळत मासे पकडण्यासाठी त्यांची सुरू असलेली धडपड काळजाला चटका लावणारी आहे. पाण्याच्या मध्यभागी जीव धोक्यात घालून मिळणाऱ्या माशांच्या विक्रीतून कुटुंबाच्या उदरनिर्वाहाला हातभार लावण्याचे काम त्या करीत आहेत. त्यांच्या हातातील वल्हे केवळ होडी पुढे नेत नाही, तर त्यांच्या कुटुंबाच्या जगण्याची आशाही पुढे नेत आहे.

स्वातंत्र्याच्या अमृतकाळानंतरही समाजातील एका घटकाला पोटासाठी पाण्याच्या प्रवाहाशी झुंज द्यावी लागत असेल, तर ही बाब निश्चितच चिंतन करायला लावणारी आहे. माधुरी पवार आणि तिच्या मुलीची होडी वेण्णा नदीच्या पाण्यात तरंगत असली, तरी त्यांच्या आयुष्याचा प्रवास मात्र आजही संघर्षाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे. चंद्रावर पोहोचण्याच्या बातम्यांचा अभिमान बाळगणाऱ्या समाजाने वेण्णा नदीच्या पात्रात उदरनिर्वाहासाठी झगडणाऱ्या या मायलेकींच्या जीवनाकडेही तितक्याच संवेदनशीलतेने पाहण्याची गरज आहे.

प्रशासन गांभीर्याने पाहणार का?

माधुरी पवार आणि तिच्या मुलीचे हे चित्र केवळ एका कुटुंबापुरते मर्यादित नाही. ते कातकरी समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीवर प्रकाश टाकणारे आहे. या समाजातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे, कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून देणे, सुरक्षित निवारा आणि शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे ही काळाची गरज आहे. नदीच्या पाण्यात जीव धोक्यात घालून मासेमारी करणाऱ्या या मायलेकींच्या संघर्षाकडे प्रशासन आणि समाजाने गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language