Hashtagintro

Shawarma Food Poisoning: भिवंडीत शोरमाचा पुन्हा ‘विषारी’ घास! 17 जणांना अन्न विषबाधा, दुकानावर महापालिकेचा थेट जेसीबीने दणका

Shawarma Food Poisoning: भिवंडीत शोरमाचा पुन्हा ‘विषारी’ घास! 17 जणांना अन्न विषबाधा, दुकानावर महापालिकेचा थेट जेसीबीने दणका

भिवंडी शहरात शोरमा खाल्ल्याने अन्न विषबाधा होण्याची दुसरी घटना समोर आली आहे. वंजारपट्टी नाका परिसरातील एका चिकन शोरमा दुकानातून शोरमा खाल्ल्यानंतर 17 जणांना उलटी, जुलाब आणि मळमळ असा त्रास सुरू झाला. या सर्वांना उपचारासाठी स्व. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची गंभीर दखल घेत भिवंडी महानगरपालिकेने संबंधित शोरमा दुकानावर थेट तोडक कारवाई केली.

मिळालेल्या माहितीनुसार, जेसीबीच्या सहाय्याने शोरमा विक्रीची टपरी जमीनदोस्त करण्यात आली आहे. पाच महिन्यांपूर्वी भिवंडी शहरात चिकन शोरमा खाल्ल्याने तब्बल 107 जणांना अन्न विषबाधा झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतरही शहरातील खाद्यपदार्थांच्या विक्रीबाबतचे प्रश्न कायम असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. वंजारपट्टी नाका परिसरातील ए.के. चिकन शोरमा या दुकानातून सोमवारी रात्री अनेकांनी शोरमा खाल्ला होता.

त्यानंतर मंगळवारी सकाळपासून काही जणांना उलटी, जुलाब आणि मळमळ होण्याचा त्रास सुरू झाला. एकाच कुटुंबातील पाच जणांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. शोरमा खाल्ल्यानंतरच रुग्णांना त्रास सुरू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली. एकूण 14 रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले होते. त्यापैकी एका रुग्णाला उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून सध्या 13 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत.

यामध्ये लहान मुलांसह एका गर्भवती महिलेचाही समावेश आहे. रुग्णांची संख्या वाढल्याने रुग्णालय प्रशासनाने वैद्यकीय व्यवस्था सज्ज ठेवली आहे. रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ. माधवी पंदारे यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस अधिकारीही रुग्णालयात दाखल झाले. अन्न विषबाधेच्या घटनेची माहिती मिळताच भिवंडी महानगरपालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक पाचचे सहाय्यक आयुक्त गिरीश गोष्टेकर, बीट निरीक्षक हनुमान म्हात्रे, आपत्कालीन कक्षप्रमुख साकिब खरबे, आरोग्य अधिकारी फैसल तातली, आरोग्य पथक, निजामपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अन्न सुरक्षा विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

त्यानंतर महापालिकेने संबंधित ए.के. चिकन शोरमा दुकानावर तोडक कारवाई केली. जेसीबीच्या सहाय्याने शोरमा विक्रीची टपरी पाडण्यात आली. या प्रकरणी निजामपूर पोलिसांकडून तपास सुरू असून संबंधित दुकानाविरोधात गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त गिरीश गोष्टेकर यांनी दिली आहे. पाच महिन्यांपूर्वी 107 जणांना अन्न विषबाधा झाल्यानंतर आता पुन्हा अशी घटना घडल्याने भिवंडीतील खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेचा आणि अन्न सुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language