Hashtagintro

Sindhudurg Rain : वैभववाडीत सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी

वैभववाडी : वैभववाडी तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी सोमवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. दिवसभर उष्णतेने हैराण नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. मात्र, भात कापणीच्या अंतिम टप्प्यात असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा पाऊस अडचणीचा ठरत आहे. रविवारनंतर सोमवारीही पावसाने हजेरी लावल्याने कापणीची कामे विस्कळीत झाली असून, उरलेसुरले भातपीक सुरक्षित घरात आणण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे.

सोमवारी दिवसभर तालुक्यात उष्णतेत कमालीची वाढ झाली होती. रविवारी सायंकाळी झालेल्या पावसाचा अनुभव आणि कृषी विभागाने दुपारनंतर पावसाचा अंदाज व्यक्त केल्यामुळे शेतकरी सतर होते. पावसाची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी सकाळपासूनच भात कापणीच्या कामाला वेग दिला. दुपारपर्यंत कापणी करून कापलेले भात सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू होती.

मात्र, रविवारच्या तुलनेत सोमवारी पावसाने लवकरच हजेरी लावली. सायं. ५ वा.पासून विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी कोसळण्यास सुरुवात झाली. अर्ध्या तासापेक्षा अधिक काळ पडलेल्या पावसामुळे परिसरात गारवा निर्माण झाला. उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी भातशेतीच्या कामांवर त्याचा परिणाम झाला.

कापणी व मळणीच्या कामांना विलंब!

तालुक्यात सध्या भात कापणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. अनेक ठिकाणी भात कापून शेतात ठेवण्यात आले आहे, तर काही ठिकाणी कापणी सुरू आहे. अशा परिस्थितीत सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे कापलेले भात भिजण्याची भीती आहे. भाताचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी कापणी केलेले पीक सुरक्षित ठिकाणी हलविण्याची धडपड करीत आहेत. पावसाचा जोर असाच सुरू राहिल्यास भात कापणी आणि मळणीच्या कामांना आणखी विलंब होण्याची शक्यता आहे.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language