Hashtagintro

Snacks Recipe: मैद्याशिवाय बनवा कुरकुरीत बटाटा-कांदा पॅटीस, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट रेसिपी

Snacks Recipe: मैद्याशिवाय बनवा कुरकुरीत बटाटा-कांदा पॅटीस, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट रेसिपी

स्ट्रीट फूडमध्ये बटाटा पॅटीस हा लोकप्रिय पदार्थ आहे. मात्र, तो बनवताना हायजिन आणि अस्वच्छ तेलाचा वापर यामुळे अनेकांची खाण्याची इच्छा कमी होते. तसेच, पॅटीस बनवण्यासाठी मैद्याचा वापर केला जात असल्याने काहीजण त्याला आरोग्यासाठी योग्य मानत नाहीत. पण घरात उपलब्ध असलेल्या कांदा आणि बटाट्यापासून तुम्ही चविष्ट आणि कुरकुरीत व्हेजिटेबल पॅटीस बनवू शकता. या पॅटीस बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ होतात. क्रीमी चीज सॉस आणि लसूण-डिल सॉससोबत त्यांची चव आणखी छान लागते. संध्याकाळच्या नाश्त्यासाठी हा पदार्थ सहज बनवता येतो. मुलांनाही हा स्नॅक्स खूप आवडेल. चला तर जाणून घेऊया, घरच्या घरी हे स्वादिष्ट व्हेजिटेबल पॅटीस कसे बनवायचे.

पॅटीस बनवण्याची कृती

सर्वप्रथम दोन कांदे सोलून अर्धे कापून घ्या. मोठ्या छिद्रांच्या किसणीने कांदे किसून घ्या. त्यानंतर दोन बटाटे सोलून किसून कांद्यामध्ये मिसळा. बटाट्याचा रंग काळा पडू नये, यासाठी ही प्रक्रिया लवकर करा. किसलेल्या भाज्या थंड पाण्याने धुऊन घ्या, जेणेकरून अतिरिक्त स्टार्च निघून जाईल. पाणी गाळून हाताने भाज्यांमधील अतिरिक्त पाणी पिळून काढा. यामुळे पॅटीसचा आकार टिकून राहण्यास मदत होईल.
एका पॅनमध्ये ऑलिव्ह ऑईल गरम करून किसलेल्या भाज्या ५ ते ७ मिनिटे परतून घ्या. कांदा गोडसर होईल आणि बटाट्याला छान सुगंध येईल. भाज्या मऊ झाल्या पाहिजेत, पण त्यांचा थोडा पोत कायम राहू द्या. परतलेल्या भाज्या एका भांड्यात काढून त्यात चवीनुसार मीठ, काळी मिरी आणि ४ मोठे चमचे कॉर्नस्टार्च किंवा तांदळाचे पीठ घालून व्यवस्थित मिसळा. यामुळे पॅटीसला घट्टपणा आणि कुरकुरीतपणा येईल.

मिश्रणाचे छोटे भाग घेऊन हात थोडे ओले करा आणि पॅटीसचा आकार द्या. पॅनमध्ये ऑलिव्ह ऑईल गरम करून पॅटीस दोन्ही बाजूंनी सोनेरी तपकिरी रंग येईपर्यंत तळून घ्या. एकावेळी जास्त पॅटीस ठेवू नका, जेणेकरून त्या व्यवस्थित आणि समान रीतीने शिजतील.

क्रीमी चीज सॉस बनवण्याची कृती

एका छोट्या पॅनमध्ये ३० ग्रॅम बटर वितळवून घ्या. बटर जळू नये म्हणून मध्यम आचेवर ठेवा. त्यात १ मोठा चमचा मैदा घालून एक मिनिट ढवळत शिजवा, जेणेकरून मैद्याचा कच्चा वास निघून जाईल. त्यानंतर १५० मिली क्रीम घालून सतत ढवळत राहा. गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्या. चवीनुसार मीठ आणि काळी मिरी घालून सॉस घट्ट होईपर्यंत ढवळत शिजवा. शेवटी किसलेले चेडर चीज घालून २ ते ३ मिनिटे शिजवा. चीज पूर्णपणे वितळून सॉस गुळगुळीत झाल्यावर क्रीमी चीज सॉस तयार होईल.

लसूण-डिल सॉस बनवण्याची कृती

एका भांड्यात १ छोटा चमचा केचप, १ मोठा चमचा मेयोनीज आणि १ चिरलेली लसूण पाकळी घ्या. हे सर्व साहित्य व्यवस्थित मिसळा. शेवटी बारीक चिरलेली ताजी डिलची पाने घालून पुन्हा एकदा मिसळा. या सॉसमुळे पॅटीसला फ्रेश आणि चविष्ट स्वाद मिळतो.

Source: TV9 Marathi Lifestyle

Read full article on TV9 Marathi Lifestyle

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language