Hashtagintro

Solapur News : बॉम्बच्या धमकीमुळे न्यायालयाला छावणीचे स्वरूप

सोलापूर : सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल सोमवारी प्राप्त झाल्यानंतर न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून, न्यायालयाच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. मंगळवारपासून न्यायालय परिसरात महाराष्ट्र सुरक्षा बल (एमएसएफ) आणि शहर पोलिस दलाचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वाढीव बंदोबस्तामुळे संपूर्ण न्यायालय परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

सोमवारी धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून न्यायालयाचे संपूर्ण कामकाज बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर पोलिस यंत्रणेने न्यायालयाची इमारत तसेच संपूर्ण परिसराची कसून तपासणी केली. या तपासणीदरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला असला, तरी धमकीच्या ई-मेलमुळे सुरक्षेच्या दृष्टीने विशेष खबरदारी घेतली जात आहे. मंगळवारपासून न्यायालयाच्या प्रवेशद्वारापासून परिसरातील विविध ठिकाणी अतिरिक्त पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये महाराष्ट्र सुरक्षा बलाचे २५ जवान, तर सोलापूर शहर पोलिस दलाचे १५ हून अधिक कर्मचारी बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. न्यायालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर पोलिसांकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

न्यायालयात येणाऱ्या व्यक्तींच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासह विनाकारण परिसरात फिरणाऱ्या व्यक्तींना अडविण्यात येत आहे. न्यायालयीन कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांची तसेच अभ्यागतांची आवश्यक ती चौकशी आणि तपासणी केली जात आहे. न्यायालयाच्या प्रवेशद्वारांवरही पोलिसांची नजर आहे.

दरम्यान, धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस यंत्रणेकडून सतर्कता बाळगली जात असून, न्यायालय परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language