Hashtagintro

Solapur News : मोहोळच्या १० कोटींच्या रस्त्यावरून श्रेयवादाची लढाई

राम कांबळे

मोहोळ शहर : मोहोळ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गवत्या मारुती चौक ते पालखी मार्ग चौक या प्रमुख रस्त्याच्या विकासासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आणि शहराच्या राजकारणात श्रेयवादाची नवी ठिणगी पडली.

निधी मंजुरीनंतर आ. राजू खरे आणि शिवसेनेचे नेते रमेश बारसकर यांनी स्वतंत्रपणे आपल्या आपल्या पाठपुराव्याचा दावा केला. यातून विकासकामापेक्षा राजकीय श्रेयाचीच चर्चा अधिक रंगू लागली आहे.

मोहोळ शहरातील हा प्रमुख रस्ता अनेक वर्षांपासून दुरवस्थेत आहे. बाजारपेठ, शासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालये आणि पालखी मार्गाकडे जाण्यासाठी याच रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. त्यामुळे रस्त्याच्या दुरुस्ती व रुंदीकरणाची मागणी नागरिकांकडून सातत्याने होत होती. अखेर नगरविकास विभागाच्या रस्ता अनुदान योजनेंतर्गत १० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, निधी मंजूर होताच श्रेयवादाला सुरुवात झाली. आमदार राजू खरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत विधानसभा निवडणुकी दरम्यान दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केल्याचे सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन रस्त्याचा प्रश्न मांडला होता. सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे निधी मंजूर झाल्याचे त्यांनी नमूद केले.

दुसरीकडे शिवसेनेचे नेते रमेश बारसकर यांनीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेल्या मागणीला यश आल्याचा दावा केला आहे. रस्त्यासाठी आपण केलेल्या पाठपुराव्यामुळेच निधी मंजूर झाल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे. त्यामुळे एकाच निधीवर दोन नेत्यांकडून श्रेयाचे दावे केले जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

या पूर्वी अनगरच्या अप्पर तहसीलच्या प्रश्नावरही रंगला होता श्रेयवाद!

आता मोहोळच्या राजकारणात विकासकामांच्या श्रेयावरून वाद होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी अनगर येथील अप्पर तहसील कार्यालयाच्या प्रश्नावरही आमदार राजू खरे, रमेश बारसकर यांच्यासह अन्य नेत्यांनी पाठपुराव्याचे श्रेय घेतले होते. त्यावेळीही राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. आता पुन्हा दहा कोटींच्या रस्त्याच्या निमित्ताने तोच राजकीय विषय ऐरणीवर आला आहे.

दहा कोटींच्या निधीवरून सुरू झालेल्या या श्रेयवादात आमदार राजू खरे हे रमेश बारसकर यांच्या दाव्याला काय प्रत्युत्तर देणार, याकडे मोहोळच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मात्र, या राजकीय चढाओढीत सर्वसामान्य नागरिकांचा मूळ प्रश्न बाजूला पडू नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

निधी कोणाच्या पाठपुराव्यामुळे आला, यापेक्षा प्रत्यक्ष काम कधी सुरू होणार, रस्त्याचा दर्जा कसा राखला जाणार आणि निर्धारित वेळेत काम पूर्ण होणार का, हेच मोहोळकरांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. या संदर्भात रमेश बारसकर यांना विचारले असता त्यांनी नगर परिषदच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मोहोळच्या प्रचाराला आले होते त्यावेळेस शहरातील मुख्यरस्त्याची व अंतर्गत रस्त्याची मागणी केली होती अशी प्रतिक्रिया दिली. या संदर्भात आमदार राजू खरे यांना संपर्क साधला असता, त्यांनी मोबाईल उचलला नाही. पुन्हा संपर्काचा प्रयत्न केला, त्यावेळी मोबाईल स्वीच ऑफ होता. त्यामुळे संपर्क झाला नाही.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language