मंगळवेढा : संतभूमी म्हणून राज्यासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात ओळख असलेल्या मंगळवेढा शहरातील ऐतिहासिक नवरात्रौत्सवाला यावर्षी व्यावसायिकता, बीभत्सपणा आणि बेबंदशाहीचे गालबोट लागले आहे.
एकेकाळी ऐतिहासिक, पौराणिक आणि समाजप्रबोधनपर देखाव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या या उत्सवात आता स्वस्त लोकप्रियतेसाठी ‘भुतांचे’ भयपट देखावे आणि कृत्रिम झगमगाट वाढला आहे. त्यातच देखावे पाहण्यासाठी भाविकांकडून सर्रास पैसे उकळणे, जबरदस्तीने देणग्या मागणे आणि रस्त्यांची कोंडी करून चाललेली हुल्लडबाजी यामुळे संतांच्या मंगळवेढ्याची बदनामी होत असून, धार्मिक उत्सवाचे रूपांतर अराजकतेत झाल्याची संतप्त भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. मंगळवेढ्यातील नवरात्रोत्सवाचे दर्शन घेण्यासाठी सीमाभागातून लाखो भाविक, महिला, लहान मुले व वृद्ध श्रद्धेने येतात.
पूर्वी येथील नवरात्र मंडळांचे कार्यकर्ते महिनाभर मेहनत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, संतांचे विचार, पौराणिक कथा त्याचे महत्व सामाजिक ज्वलंत प्रश्न अथवा देशातील प्रसिद्ध मंदिरांच्या देखण्या प्रतिकृती उभारून प्रबोधन करत. मात्र, नव्या पिढीतील काही तथाकथित कार्यकर्त्यांनी उत्सवाचा मूळ गाभाच हरवून टाकला आहे. उत्सवातून मनोरंजन अथवा उद्बोधन तर लांबच, उलट भीतीदायक, हिडीस आणि बटबटीत भुतांचे देखावे मांडून महिला व बालकांना वेठीस धरले जात आहे. अशा थिल्लर देखाव्यांमुळे शहराची संस्कृती धुळीस मिळत असल्याचे सुजाण नागरिकांचे म्हणणे आहे.उत्सवाचे पावित्र्य संपवून काही मंडळांनी याला निव्वळ कमाईचे साधन बनवले आहे.
सार्वजनिक रस्त्यांवर अथवा अडचणीच्या ठिकाणी महाकाय मांडव टाकून देखावे पाहण्यासाठी नागरिकांकडून चक्क पैसे (तिकीट) उकळण्याची नवी अनिष्ट प्रथा सुरू झाली आहे. व्यापारी, व्यावसायिक व सामान्य नागरिकांवर देणग्यांसाठी दबाव टाकणे, जबरदस्तीने पावत्या फाडणे आणि बाहेरून आलेल्या भाविकांची लूट करणे असे प्रकार खुलेआम सुरू आहेत.
शहरातील अरुंद गल्ल्या आणि मुख्य रस्त्यांवर नियम धाब्यावर बसवून देखावे उभे केले जातात. तिथे लावल्या जाणाऱ्या लांबलचक रांगांमुळे सामान्य नागरिकांची, रुग्णांची आणि व्यापाऱ्यांची रोजची ये-जा ठप्प झाली आहे. या गर्दीचा गैरफायदा घेत टपोरी आणि हुल्लडबाज टोळक्यांचा सुळसुळाट वाढला असून, महिला व युवतींची छेडछाड आणि थिल्लरबाजीच्या घटनांत वाढ झाली आहे.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या अशा गैरप्रकारांना आळा घालण्याऐवजी स्थानिक स्वराज्य संस्थांचे काही लोकप्रतिनिधी आणि तथाकथित पुढारी स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी अशा मंडळांना खतपाणी घालत आहेत. पोलीस प्रशासन आणि नगरपरिषद प्रशासनाने डोळेझाक केल्यामुळेच या बेबंदशाहीला मोकळे रान मिळाले असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
Source: Pudhari News
