सोलापूर : जिल्ह्यात जनावरांसाठीची संभाव्य चारा टंचाई लक्षात घेऊन कृषी विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय जमिनींवर चारा पिकांची लागवड करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे २० लाख जनावरांसाठी दिलासा मिळणार आहे.
कृषी विभागाकडून जमिनी निश्चित केल्या जात आहेत. यासाठी संबंधित जमिनींची उपलब्धता आणि आवश्यक सिंचन सुविधांचा विचार करून चारा लागवडीचे नियोजन केले जाणार आहे. पारंपरिक चारा पिकांसोबतच हायड्रोफोनिक पद्धतीने चारा उत्पादन, अझोला निर्मिती आणि बिनकाटेरी निवडुंग लागवड यांसारख्या पर्यायी स्रोतांनाही प्रोत्साहन दिले जाणार आहे.
कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून या पद्धतींचा प्रचार व प्रसार मोहीम स्वरूपात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कृषी विभागाच्या संबंधित संस्थांनी आपल्या प्रक्षेत्रावर चारा लागवडीचे प्रात्यक्षिक प्लॉट विकसित करावेत. या प्रक्षेत्रांचा उपयोग शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे, चारा पिकांच्या सुधारित पद्धतींची माहिती देणे आणि नवीन तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी करण्यात येणार आहे. दरम्यान, चारा कापणी आणि गठ्ठे बांधणीसाठी आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध होण्याच्या दृष्टीनेही पावले उचलण्यात येत आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील कस्टम हायरिंग सेंटर आणि कृषी औजारे बँकांकडे उपलब्ध असलेल्या यंत्रसामग्रीची माहिती शेतकरी तसेच पशुसंवर्धन विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना द्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील चारा उपलब्धतेचे अचूक नियोजन करण्यासाठी चारा पिकांखालील क्षेत्र, पीकनिहाय पेरणी क्षेत्र आणि पीक अवशेषांसह अपेक्षित चारा उत्पादनाची माहिती संकलित केली जाणार आहे. तसेच चारा उत्पादक शेतकरी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी आवश्यक माहिती संबंधित यंत्रणांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
चारा उत्पादन वाढविणे, उपलब्ध चाऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे आणि पशुधनासाठी भविष्यातील संभाव्य टंचाई टाळणे यासाठी कृषी विभाग आणि पशुसंवर्धन विभागाच्या विभागीय, जिल्हा व तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याचा फायदा जिल्ह्यातील पशुधनासाठी होणार असल्याने शेतकरी व पशुपालकातून या नियोजनाचे स्वागत होत आहे. काही प्रमाणात चारा प्रश्न मार्गी लागेल.
Source: Pudhari News
