
आदिवासी विकास विभागातील विविध प्रश्नांवरून राज्यभरातील विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असतानाच आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी केलेल्या विधानामुळे नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असल्याबाबत विचारले असता, आंदोलन सुरू आहे कुठे? असा सवाल त्यांनी केला. यंदाची दिवाळी आंदोलनमुक्त साजरी केल्याचा दावाही त्यांनी केला. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत मंत्र्यांना नेमकी किती माहिती आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आदिवासी विकास विभागाच्या विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांकडून आंदोलन केले जात आहे. विभागातील प्रश्न, प्रलंबित मागण्या आणि विद्यार्थ्यांच्या अडचणी यावर तोडगा काढण्याची मागणी होत आहे. मात्र, आंदोलनाबाबत विचारणा केल्यानंतर मंत्री उईके यांनी केलेल्या प्रतिक्रियेमुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चा रंगण्याची शक्यता आहे. एकीकडे विद्यार्थ्यांचे प्रश्न ऐरणीवर असताना दुसरीकडे आंदोलनच सुरू आहे कुठे, असा सवाल मंत्र्यांनी केल्याने त्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
दुसरीकडे आदिवासी विकास विभागांतर्गत काम करणाऱ्या बांधकाम ठेकेदारांची कोट्यवधी रुपयांची देयके राज्यभरात अडकली आहेत. अनेक ठेकेदारांची बिले प्रलंबित असल्याने त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र या देयकांबाबत विचारले असता मंत्री अशोक उईके यांनी आपल्याला याची माहिती नसल्याचे स्पष्ट केले. देयके नेमकी का अडकली आहेत, याची चौकशी करून माहिती देतो, असे उत्तर त्यांनी दिले. त्यामुळे विभागाच्या कामकाजावर आणि प्रलंबित देयकांच्या प्रश्नावर पुन्हा एकदा लक्ष केंद्रित झाले आहे.
राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना मंत्री उईके यांनी मुख्यमंत्री संवेदनशील असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी करत आहेत. शेतकरी हे मुख्यमंत्र्यांच्या केंद्रस्थानी असून त्यांना निश्चितच मदत मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याचवेळी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी माजी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या निवासस्थानी भेट दिली. गावित यांच्या प्रकृतीची त्यांनी विचारपूस केली. या भेटीमुळे राजकीय चर्चांनाही वेगळा संदर्भ मिळाला आहे.
Source: TV9 Marathi National
