मस्कत : सलामीवीर आर्यवीर सहवागच्या आक्रमक शतकी खेळीच्या बळावर भारतीय संघाने ‘करो या मरो’च्या लढतीत संयुक्त अरब अमिरातीचा (यूएई) ७० धावांनी धुव्वा उडवला. मंगळवारी झालेल्या या एकतर्फी विजयासह भारताने १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश निश्चित केला. भारताचे माजी दिग्गज फलंदाज वीरेंद्र सहवाग यांचे सुपुत्र असलेल्या आर्यवीरने झळकावलेल्या १६० धावांच्या तडाखेबंद खेळीमुळे भारताने प्रथम फलंदाजी करताना ७ गड्यांच्या मोबदल्यात ३०९ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात आव्हानाचा पाठलाग करताना यूएईचा संपूर्ण संघ २३९ धावांवर गारद झाला. या विजयासह ‘अ’ गटात चार गुणांसह दुसऱ्या स्थानावर राहिलेला भारतीय संघ आता गुरुवारी (१२ नोव्हेंबर) उपांत्य फेरीत अफगाणिस्तानशी दोन हात करेल.
गेल्या रविवारी पाकिस्तानविरुद्ध पत्कराव्या लागलेल्या पराभवानंतर भारतासाठी ही लढत जिंकणे अनिवार्य होते. अशा मोक्याच्या क्षणी मैदानात उतरलेल्या आर्यवीरने सुरुवातीला संयमी खेळ केला, परंतु जम बसल्यानंतर चौकार आणि षटकारांची आतषबाजी करत यूएईच्या गोलंदाजांची दाणादाण उडवून दिली. त्याने आपल्या खात्यात तब्बल १७ चौकार आणि ७ गगनचुंबी षटकारांची नोंद केली. सुरुवातीला सावध पवित्रा घेणाऱ्या आर्यवीरला खाते उघडण्यासाठी १४ चेंडूंचा सामना करावा लागला. हिदायतुल्लाह खानच्या चेंडूवर मिड-विकेटच्या दिशेने चौकार ठोकत त्याने धावफलक हालता केला. त्याने डावात तब्बल ९७ चेंडू निर्धाव (डॉट) खेळले, जे पाहता तंत्रात आणखी सुधारणेची गरज अधोरेखित झाली.
Aaryavir Sehwag is the Player of the Match for his brilliant knock
Courtesy of a 70-run win, India U19 enter the semi-finals where they will face Afghanistan U19 on Thursday
Scorecard ▶️ https://t.co/M0EJVCkM56
#MensU19AsiaCup https://t.co/vsGh5hILnx
— BCCI (@BCCI) November 10, 2026
डावाच्या सुरुवातीला प्रतिस्पर्ध्यांच्या वेगवान गोलंदाजांवर दबाव आणताना आर्यवीरने विशेषतः नुरुल्लाह अयुबीला लक्ष्य केले. त्याने क्रीझबाहेर पडून नुरुल्लाहविरुद्ध दोन अप्रतिम फटके लगावले. डावाच्या १४ व्या षटकात आर्यवीरचा सलामीचा साथीदार आणि कर्णधार लक्ष्य रायचंदानी बाद झाला; त्याचा ‘पुल शॉट’ थेट स्क्वेअर लेगवरील क्षेत्ररक्षकाच्या हाती विसावला. जोडीदार बाद झाल्यानंतरही आर्यवीरने आक्रमकता कायम ठेवली. त्याने डावखुरा फिरकीपटू झैनुल्लाह रहमानीविरुद्ध सुरेख ‘इनसाइड-आउट’ षटकार खेचला. त्यानंतर नुरुल्लाहच्या चेंडूवर षटकार ठोकत त्याने ६९ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले.
अर्धशतकानंतर आर्यवीरचा खेळ अधिक सफाईदार झाला. हिदायतुल्लाहच्या गोलंदाजीवर त्याने एका हाताने देखणा ‘कव्हर ड्राइव्ह’ मारत नव्वदी पार केली आणि त्यानंतर फिरकीपटू बिलाल खानच्या चेंडूवर एकेरी धाव घेत १३१ चेंडूंत आपले शतक पूर्ण केले. शतकानंतर तर त्याने गिअर बदलत गोलंदाजीवर संपूर्ण वर्चस्व गाजवले आणि पुढील अवघ्या ३७ चेंडूंत ६० धावा कुटल्या. नुरुल्लाहला सरळ रेषेत षटकार ठोकत त्याने दीडशे धावांचा टप्पा ओलांडला. अखेर १६८ चेंडूंत १६० धावांची मॅरेथॉन खेळी करून तो नसीम खानच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. भारताकडून व्ही. के. विनीतने ६९ चेंडूंत ६७ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले, तर अन्वय द्रविडने ९ चेंडूंत एका षटकारासह १२ धावा फटकावल्या.
विजयासाठीच्या ३१० धावांच्या डोंगराएवढ्या लक्ष्याचा पाठलाग करताना यूएईची फलंदाजी सुरुवातीपासूनच भारतीय माऱ्यापुढे चाचपडताना दिसली. भारतीय गोलंदाजांनी अचूक टप्पा आणि वेधावर गोलंदाजी करत यूएईच्या आघाडीच्या फळीला वेसण घातली. अहमद खुदादादने एकाकी लढा देत ७४ चेंडूंत ७४ धावांची झुंजार खेळी केली, तर डावाच्या अखेरीस अयुबीने ३९ धावांची जोड दिली. मात्र, इतर फलंदाजांना वाढत्या आवश्यक धावगतीचा भार पेलवला नाही आणि ठरावीक अंतराने विकेट्स पडत राहिल्या. भारताकडून इशान सूदने अचूक यॉर्कर्सचा सुरेख मारा करत सर्वाधिक ४ बळी टिपले. परिणामी, ५० षटकांत यूएईचा संपूर्ण संघ २३९ धावांवर आटोपला आणि भारताने दणदणीत विजयावर शिक्कामोर्तब केले.
Source: Pudhari News
