गारगोटी : शिक्षकांचे प्रश्न समजून घेणारा आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने लढणारा प्रतिनिधी विधानपरिषदेत असणे आवश्यक आहे. याच भूमिकेतून शिक्षकांच्या प्रश्नांसाठी गेली अनेक वर्षे कार्यरत असलेले सचिन सानप यांना शिवसेनेने पाठिंबा दिला असून, त्यांना कोल्हापूर जिल्ह्यातून मताधिक्य द्या, असे आवाहन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. ते कोल्हापूर येथे सचिन सानप यांच्या प्रचारार्थ आयोजित शिवसेना पदाधिकारी व शिक्षकांच्या मेळाव्यात बोलत होते.
मंत्री सामंत म्हणाले, उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेतेे एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यात शिक्षकांच्या प्रश्नांसाठी गेली अनेक वर्षे सातत्याने कार्यरत असलेले शिक्षक उमेदवार सचिन सानप यांना शिवसेनेचा अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, सचिन सानप हे स्वतः शिक्षक असल्याने त्यांना शिक्षकांच्या अडचणी, अपेक्षा आणि समस्या यांची प्रत्यक्ष जाण आहे. त्याचबरोबर विशेष कार्य अधिकारी म्हणून काम करताना मिळालेला प्रशासकीय अनुभव त्यांच्या कार्यक्षमतेला अधिक बळ देणारा आहे.
यावेळी खा. धैर्यशील माने, आ. चंद्रदीप नरके, आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी खा. संजय मंडलिक, महापालिका गटनेते शारंगधर देशमुख आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी आ. सुजित मिणचेकर, शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, अरुण जाधव, जिल्हाप्रमुख विजय बलुगडे, रवींद्र माने, सुजित चव्हाण, समन्वयक सत्यजित कदम, उपमहापौर अक्षय जरग, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, वीरेंद्र मंडलिक उपस्थित होते.
Source: Pudhari News
