उद्धव ठाकरे आज दुपारी १२ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट देणार आहेत. शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करणे हा या भेटीचा मुख्य उद्देश आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते, त्यानंतर त्यांना डिस्चार्ज मिळाला होता.
या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. शरद पवार यांच्यावर उपचार सुरू असताना अनेक नेत्यांनी त्यांची भेट घेतली होती, मात्र उद्धव ठाकरे यांना त्यावेळी भेटता आले नव्हते. आता ते पवारांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेणार आहेत.
या भेटीदरम्यान केवळ प्रकृतीची विचारपूसच नव्हे, तर महत्त्वाच्या राजकीय मुद्द्यांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. विशेषतः, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विलिनीकरणासंदर्भात सुरू असलेल्या हालचालींवर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात संवाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या भेटीतून महाराष्ट्राच्या राजकारणात काही नवीन समीकरणे समोर येतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Source: TV9 Marathi National
