वातावरणामध्ये पुन्हा एकदा मोठा बदल पहायला मिळत आहे, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हा कमी दाबाचा पट्टा पुढील काही तासांमध्ये चक्रीवादळात रुपांतरीत होण्याची शक्यता आहे.
परिणामी हवामान विभागाकडून बारा राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला असून, नागरिकांना सतर्कतेतचं आवाहन करण्यात आलं आहे.
दरम्यान या काळात फक्त मुसळधार पाऊसच पडणार नाही तर 60 ते 90 किमी प्रति तास वेगाने वारे देखील वाहण्याची शक्यता आहे. काही भागात विजा आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे.
अंदमान आणि निकोबार बेटं, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये हवामान विभागाकडून पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्राबाबत बोलायचं झाल्यास राज्यात आकाश पूर्णपणे कोरडं राहणार असून, कुठेही पावसाची शक्यता नाही. मात्र काही जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे.
Source: TV9 Marathi National





