
गोकुळमध्ये महायुतीने बाजी मारली आहे. महायुतीने आता राजेश पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत गोकुळच्या अध्यक्षपदी त्यांची वर्णी लावली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली आज एक सभा पार पडली. यामध्ये अध्यक्षपदासाठी सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीकडून शशिकांत पाटील चुयेकर आणि महायुतीकडून राजेश पाटील यांच्यामध्ये थेट लढत झाली. या लढतीमध्ये राजेश पाटील यांचा विजय झाला आहे. त्यांच्या नावाची अधिकृत घोषणाही झाली.
कोण आहेत राजेश पाटील?
राजेश नरसिंगराव पाटील यांनी कोल्हापूरमधील चंदगड मतदारसंघाचे याआधीच नेतृत्व केले आहेत म्हणजे ते तिथले माजी आमदार असून हसन मुश्रीफ आणि दिवंगत अजित पवार यांचे विश्वासू अशी त्यांची ओळख आहे. २०२४ मध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे बंडखोर शिवाजी पाटील यांनी त्यांचा पराभव केलेला. दरम्यान, यापूर्वी या मतदारसंघामध्ये नरसिंह गुरुनाथ पाटील हेसुद्ध आमदार होते.
दरम्यान, जोपर्यंत अजित पवार मुख्यमंत्री होणार नाहीत, तोपर्यंत आपण फेटा बांधणार नाही, असाही निर्धार राजेश पाटील यांनी केला होता. राजेश पाटील हे शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांचे मेहुणेही आहेत. २०१९ला ते चंदगडमधून आमदार म्हणून विजयी झालेले. परंतू मागच्या गोकुळ निवडणुकीत राजेश पाटील यांच्या पत्नी आणि माजी खासदाक संजय मंडलिक यांचे सुपुत्र विरेंद्र मंडलिक यांना पराभव पत्करावा लागलेला. हा पराभव त्यांना जिव्हारी लागलेला. यावरुन त्यांनी मुश्रीफ यांच्यावर टीका केली होती, पण यावर्शी मुश्रीफांनीही राजेश पाटील यांना पाठींबा दिल्याने जुना वाद आता संपूष्टात आला आहे. राजकीय पार्श्वभूमी असल्याने त्यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली आहे, असं राजकीय जाणकार सांगत आहेत.
दरम्यान, आज सकाळपासूनच गोकुळमध्ये मोठ्या घडामोडी घडल्या. सतेज पाटील यांच्या आघाडीचे १३ विजयी उमेदवार गोकुळमध्ये दाखल झालेले. त्याचवेळी महायुतीचेही सर्व १२ उमेदवार अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी पोहोचलेले. शासनाचे ४ संचालकही यावेळी तिथे हजर होते. त्यानंतर दोन्ही बाजूंनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.
Source: TV9 Marathi National
