Hashtagintro

गोंदियातील पालावरच्या शाळेतील 30 मुलांनी घेतली राज्यपालांची भेट; पहिल्यांदाच समुद्र पाहून मुलांचा आनंद गगनात

गोंदिया जिल्ह्यातील कुडवा येथील पालावरच्या शाळेत शिकणाऱ्या मांग गारुडी समाजातील 30 मुलामुलींनी मुंबईतील लोकभवन येथे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची भेट घेतली. यावेळी राज्यपालांनी मुलांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या शिक्षणाची आणि अनुभवांची माहिती जाणून घेतली. मुंबई दर्शनादरम्यान या मुलांनी पहिल्यांदाच अथांग समुद्र पाहिला. नेहरू विज्ञान केंद्र, सिद्धिविनायक मंदिर आणि विधान भवनाला भेट दिल्यानंतर समुद्राचे दृश्य त्यांच्यासाठी सर्वाधिक आकर्षण ठरले. समुद्र पाहिल्यानंतरचा आनंद मुलांनी राज्यपालांशी संवाद साधताना व्यक्त केला. लोकभवन येथे झालेल्या भेटीदरम्यान मांग गारुडी समाजातील 30 विद्यार्थ्यांनी भगवद्गीतेतील पंधरावा अध्याय मुखोद्गत म्हणून दाखवला. मुलांचे पाठांतर आणि स्पष्ट उच्चार पाहून राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. भटक्या विमुक्त विकास परिषद आणि भटके विमुक्त कल्याणकारी परिषद यांच्या माध्यमातून पालावरच्या शाळा चालविल्या जात आहेत. रोजगारासाठी पालकांचे विविध राज्यांत स्थलांतर होत असल्याने मुलांचे शिक्षण खंडित होते. अशा मुलांना शिक्षण, संस्कार आणि शिस्तीचे धडे देण्याचे महत्त्वपूर्ण काम या उपक्रमातून केले जात आहे. राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी मुलांना नियमित अभ्यास करण्याचा, आरोग्याची काळजी घेण्याचा आणि चांगले नागरिक बनण्याचा सल्ला दिला. शिक्षणासोबत रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्याची सूचनाही त्यांनी केली. आगामी सुट्ट्यांमध्ये विद्यार्थ्यांना पुणे दर्शन घडविण्याचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language