
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेत सुंदरलालची भूमिका साकारणारा अभिनेता मयूर वकानी सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना हसवणाऱ्या मयूरचा एक भावूक क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राजस्थानमधील पुष्कर इथं पोहोचलेल्या मयूरने ब्रह्मा मंदिरात दर्शन घेतलं आणि आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ पितृ तर्पण विधी केला. या विधीदरम्यान तो भावूक झाला आणि त्याच्या डोळ्यांत अश्रू तरळले. त्याच्या या व्हिडीओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
मयूर वकानीने नुकतीच राजस्थानमधील पवित्र तीर्थक्षेत्र पुष्कर इथं भेट दिली. यावेळी त्याने प्रसिद्ध ब्रह्मा मंदिरात जाऊन चतुर्मुखी ब्रह्मदेव आणि माता गायत्री यांचं दर्शन घेतलं. मंदिरातील धार्मिक विधींमध्ये सहभागी होत त्याने श्रद्धेनं पूजा केली. यावेळी त्याला मंदिराची धार्मिक परंपरा आणि पुष्करचं आध्यात्मिक महत्त्व याविषयीही माहिती देण्यात आली. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मयूरने पुष्कर सरोवर इथं आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ पितृ तर्पण केलं. हिंदू धर्मात पितरांचं स्मरण करून त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करण्याला विशेष महत्त्व आहे. हा विधी करताना मयूरला आपल्या प्रियजनांची आठवण झाली आणि तो भावूक झाला.
पहा व्हिडीओ-
View this post on Instagram
मयूर वकानीच्या भावूक होण्यामागे त्याच्या कुटुंबाशी संबंधित एक महत्त्वाची घटना आहे. एप्रिल 2026 मध्ये त्याचे वडील भीम वकानी यांचं निधन झालं होतं. भीम वकानी हे गुजराती रंगभूमीवरील प्रसिद्ध कलाकार होते. त्यांनी आपल्या अभिनयातून स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. विशेष म्हणजे, त्यांनी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतही काम केलं होतं. वडिलांच्या निधनाने मयूर आणि त्याची बहीण दिशा वकानी यांना मोठा धक्का बसला होता. दिशा वकानीने मालिकेत दयाबेनची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे. वडिलांच्या आठवणी आणि त्यांच्याशी जोडलेले भावनिक बंध यामुळे पुष्कर इथं पितृ तर्पण करताना मयूरला अश्रू अनावर झाल्याचं दिसून आलं.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत मयूर वकानीने साकारलेला सुंदरलाल हा प्रेक्षकांच्या आवडीचा विनोदी पात्र आहे. जेठालालचा मेहुणा म्हणून मालिकेत येणारा सुंदरलाल आपल्या वेगळ्या स्वभावामुळे आणि जेठालालसोबतच्या खट्याळ संवादांमुळे नेहमीच चर्चेत असतो. मयूर आणि दिशा हे खऱ्या आयुष्यातही बहीण-भाऊ आहेत. पडद्यावर या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष आवडली.
Source: TV9 Marathi National
