आपल्या लोकांच्या आयुष्यातील अडचणी दूर करून त्यांच्या मनात आशेचा दिवा लावणे हीच खरी दिवाळी असल्याचे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. दिव्यांग बांधवांसोबत दिवाळीचा स्नेहमेळावा साजरा करताना त्यांनी ही भावना बोलून दाखवली. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन, रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि आरोग्यदूत फाउंडेशन यांच्या एकत्रित प्रयत्नातून उपमुख्यमंत्र्यांच्या नंदनवन निवासस्थानी हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमामुळे नंदनवन हे केवळ सरकारी निवासस्थान न राहता खऱ्या अर्थाने आनंदाचे ठिकाण बनल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, हे निवासस्थान सामान्य लोकांचे, गरजूंचे आणि दिव्यांगांचे हक्काचे घर आहे. शरीराने काही मर्यादा असल्या तरी दिव्यांग बांधवांमध्ये प्रचंड इच्छाशक्ती आणि चिकाटी आहे. त्यांच्या मागे ठामपणे उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे. आजच्या या कार्यक्रमामुळे माझी दिवाळी खऱ्या अर्थाने साजरी झाल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. दिव्यांगांच्या हितासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहितीही त्यांनी यावेळी दिली. दिव्यांगांना त्यांचे हक्क मिळावेत म्हणून राज्यात स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांना रोजगाराची संधी मिळाली आणि ते स्वावलंबी झाले. जिल्हा नियोजन समितीच्या एकूण निधीतून एक टक्का निधी थेट दिव्यांगांच्या कल्याणासाठी वापरण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
https://www.prahaar.in/2026/11/08/pm-modi-greets-bharat-ratna-lk-advani-on-100th-birthday-lauds-journey-from-scratch/
ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंद आश्रमात आतापर्यंत दीड हजारांपेक्षा जास्त दिव्यांगांना कृत्रिम हात-पाय, वॉकर, श्रवणयंत्र आणि इतर गरजेची उपकरणे देण्यात आली आहेत. हा उपक्रम फक्त एका शहरापुरता न ठेवता आता राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबवला जाणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. जन्मजात हृदयविकार असलेल्या मुलांच्या शस्त्रक्रिया आणि कॉक्लिअर इम्प्लांटमुळे पुन्हा ऐकू-बोलू लागलेल्या मुलांसोबतही नुकतीच दिवाळी साजरी केल्याचे त्यांनी सांगितले. त्या मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून वेगळेच समाधान मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
यावर्षी दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत असल्याचे सांगत उद्या जालन्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. शेतकऱ्यांनी धीर सोडू नये आणि कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये. सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. ही राजकारण करण्याची वेळ नाही, तर माणुसकीने संकटात असलेल्यांच्या मागे उभे राहण्याची वेळ आहे, असे भावनिक आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपमुख्यमंत्र्यांनी दिव्यांग बांधवांसोबत फराळाचा आस्वाद घेतला. त्यांना भेटवस्तू देत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
Source: Prahaar News