80 च्या दशकात विठ्ठल भक्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या चित्रपटांची निर्मिती होत होती. अशातच एक 'पंढरीची वारी' नावाचा चित्रपट रमाकांत कोठेकर यांनी तयार करायचा ठरवला.
सुरुवातीला या चित्रपटात प्रमुख कलाकार म्हणून रंजना आणि अरूण सरनाईक यांची निवड करण्यात आली होती. चित्रपटाचं चित्रीकरणही काही प्रमाणात झालं होतं.
चित्रपट पूर्ण होणारच होता, मात्र नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. चित्रपटातील मुख्य पात्र अरूण सरनाईक यांचं अपघाती निधन झालं. दुसरीकडे अभिनेत्री रंजना यांचा मोठा अपघात झाला आणि त्या कायमच्या व्हीलचेअरवर आल्या.
या सर्व घडामोडींनंतर निर्मात्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं. अनेकांनी हा चित्रपट बंद करण्याचा सल्ला दिला. मात्र कोठेकरांनी हार मानली नाही.
काही वर्षांनंतर पुन्हा रमाकांत यांनी या चित्रपटाच्या चित्रीकरणास नव्या कलाकारांसह सुरुवात केली. यावेळी चित्रपटात अभिनेत्री जयश्री गडकर आणि अभिनेता बाळ धुरी यांची निवड झाली. दोन्ही अभिनेत्यांनी दमदार काम केलं आणि विठ्ठल भक्तीसाठी आजही या चित्रपटाची आठवण काढली जाते.
Source: TV9 Marathi National





