Hashtagintro

नेमबाजीच्या मैदानाबाहेरही मनू भाकरचा धमाका! जागतिक स्तरावर मिळाली सर्वात मोठी जबाबदारी; आता थेट नियम ठरवणार!

नवी दिल्ली : ऑलिम्पिक पदकांची कमाई करून संपूर्ण देशाची मान उंचावणारी भारताची स्टार नेमबाज मनू भाकर आता जागतिक नेमबाजीच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाच्या प्रतिष्ठित खेळाडू समितीवर सदस्य म्हणून मनू भाकरची अधिकृत निवड झाली आहे. तिचा हा कार्यकाळ 2026 ते 2030 या चार वर्षांसाठी असेल. नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाला महासंघाकडून या निवडीची अधिकृत पुष्टी प्राप्त झाली आहे.
16 नोव्हेंबर रोजी जर्मनीतील म्युनिक येथून जारी केलेल्या एका अधिकृत पत्राद्वारे आयएसएसएफचे अध्यक्ष लुसियानो रॉसी आणि महासचिव अलेसँड्रो निकोट्रा दि सॅन जियाकोमो यांनी मनू भाकरचे या नेत्रदीपक यशाबद्दल विशेष अभिनंदन केले. ही निवड कोणत्याही नामनिर्देशनातून नसून थेट जगभरातील सक्रिय नेमबाजांनी केलेल्या ऑनलाइन मतदानाच्या आधारावर झाली आहे. इजिप्तमधील कैरो येथे पार पडलेली आयएसएसएफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धा (300 मीटर रायफल) आणि कतारमधील दोहा येथे झालेली जागतिक अजिंक्यपद स्पर्धा (रायफल, पिस्तूल आणि शॉटगन) या दोन प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धांदरम्यान ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.
रायफल, पिस्तूल आणि शॉटगन या तिन्ही विभागांमधून समितीवर निवड झालेल्या एकूण 6 खेळाडूंमध्ये मनू भाकरने आपले स्थान पक्के केले आहे. या निवडणुकीत 20 सदस्य महासंघांमधील तब्बल 22 उमेदवार रिंगणात होते. प्रत्येक नेमबाजी प्रकारातून 2 प्रतिनिधींची निवड खेळाडूंनी स्वतः मतदानातून केली असून, समितीच्या उर्वरित सदस्यांची निवड आता आयएसएसएफ कार्यकारी समितीद्वारे केली जाईल.
https://www.prahaar.in/2026/11/17/big-names-including-head-and-mitchell-starc-released-ahead-of-the-ipl-auction-2027-see-the-list-for-all-10-teams/
या मोठ्या जबाबदारीनंतर प्रतिक्रिया देताना मनू भाकर म्हणाली की, खेळाडू समितीच्या सदस्य म्हणून निवड होणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. सहकारी नेमबाजांनी दाखवलेल्या या विश्वासाबद्दल तिने मनापासून कृतज्ञता व्यक्त केली. आगामी काळात जागतिक स्तरावर खेळाडूंचा आवाज अधिक बुलंद करणे, स्पर्धांचे नियम आणि वेळापत्रक अधिक स्पष्ट ठेवणे, तसेच खेळाडूंसाठी एक सक्षम सहाय्य प्रणाली विकसित करणे यावर आपला भर असेल, असे तिने स्पष्ट केले. यासोबतच तळागाळातील नवीन प्रतिभेला प्रोत्साहन देऊन संपूर्ण नेमबाजी समुदायाला पुढे नेण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही तिने सांगितले.
नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाने मनू भाकरच्या या निवडीचे जोरदार स्वागत केले आहे. मनूच्या या नियुक्तीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडूंच्या समस्या मांडण्यात आणि त्यांच्या हिताचे रक्षण करण्यात भारताचा सहभाग अधिक मजबूत होईल, असा विश्वास एनआरएआयने व्यक्त केला आहे. विशेषतः आगामी 2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने भारतासाठी ही घडामोड अत्यंत सकारात्मक आणि महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language