
मराठी चित्रपटसृष्टीत अनेक गाणी आली आणि गेली, पण काही गाणी काळाच्या सीमा ओलांडून कायमची अजरामर होतात. १९८७ मध्ये रिलीज झालेल्या ‘गंमत जंमत’ या सुपरहिट चित्रपटातील ‘अश्विनी ये ना’ हे गाणं म्हणजेच असाच एक सुवर्ण ठेवा आहे. अशोक सराफ आणि चारुशीला साबळे यांच्यावर खिळवून ठेवणारं हे गाणं आजही लोकांच्या ओठांवर आहे. या गाण्याला किशोर कुमार आणि अनुराधा पौडवाल यांनी दिलेला आवाज अप्रतिम आहे. पण या गाण्याच्या रेकॉर्डिंगमागे एक रंजक किस्सा दडलेला आहे, जो कदाचित अनेकांना माहीत नसेल.
मराठी उच्चारांची भीती अन् किशोर कुमार यांचा नकार
चित्रपटाचे दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांना या रोमँटिक गाण्यासाठी थेट किशोर कुमार यांच्या आवाजाची जादू हवी होती. त्यांनी गाण्याचे संगीत आणि चाल किशोर कुमार यांना ऐकवली, जी त्यांना खूप आवडलीसुद्धा. मात्र, प्रश्न होता भाषेचा. मराठी भाषेतील विशेषतः ‘च’ आणि ‘ळ’ या शब्दांचे उच्चार करताना आपल्याला अडचण येईल, या भीतीने किशोर कुमार यांनी हे मराठी गाणं गाण्यास सुरुवातीला स्पष्ट नकार दिला होता.
गीतकार शांताराम नांदगावकर यांची भन्नाट युक्ती
किशोर कुमार यांच्याकडूनच हे गाणं गाऊन घ्यायचा सचिन पिळगावकर यांचा हट्ट होता. अशातच गीतकार शांताराम नांदगावकर यांनी एक भन्नाट शक्कल लढवली. त्यांनी किशोर कुमार यांना ज्या शब्दांच्या उच्चारात अडचण येत होती, ते शब्द गाण्याच्या मुखड्यातूनच वगळले. गाण्याचे शब्द अशा पद्धतीने फेररचना करून लिहिले की, किशोर कुमार यांना ते गाताना कोणतीही अडचण येणार नाही. गीतकाराची हीच आयडिया अचूक कामी आली आणि अखेर किशोर कुमार यांनी गाण्यासाठी होकार दिला.
नृत्याची अडचण आणि सचिन पिळगावकर यांची धावपळ
गाण्याच्या रेकॉर्डिंगचा प्रश्न मिटल्यानंतर चित्रीकरणाच्या वेळी आणखी एक पेच निर्माण झाला. ज्या कोरिओग्राफरला ठरवण्यात आले होते, ते ऐनवेळी उपलब्ध होऊ शकले नाहीत. अशा कठीण प्रसंगी दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी स्वतः पुढे येत या गाण्याची सुंदर कोरिओग्राफी केली. अरुण पौडवाल यांचे संगीत, शांताराम नांदगावकर यांचे शब्द आणि किशोर-अनुराधा यांचा स्वर अशा सगळ्या कष्टांतून तयार झालेलं ‘अश्विनी ये ना’ हे गाणं आजही मराठीतील एक ऑल-टाइम फेव्हरेट गाणं म्हणून ओळखलं जातं.
Source: TV9 Marathi National
