Hashtagintro

मुंबईतील १० अग्निशमन केंद्र बनणार ऊर्जेत स्वावलंबी, भायखळा मुद्रणालयासाह १० अग्निशमन केंद्रांवर सौर ऊर्जा प्रकल्प साकारणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेने आता वीज बचतीचा मार्ग अवलंबवण्यास सुरुवात केली असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी मुंबई महापालिकेने आपल्या कार्यालयांमध्ये सौर ऊर्जा निर्मितीचा संकल्प केला आहे. यापूर्वी भांडुप संकुलांसह काही शाळांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प राबवल्यानंतर आता महापालिकेच्यावतीने काही अग्निशमन दलाची केंद्र तसेच भायखळा येथील महानगरपालिका मुद्रणालयाच्या छतांवर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. एकूण ११ ठिकाणी निर्माण केल्या जाणाऱ्या या सौर ऊर्जा प्रकल्पांतून सुमारे ७०० किलोवॅट क्षमतेची वीज निर्मिती केली जाणार आहे.

महापालिकेच्या ‘नेट झिरो म्युनिसिपल अॅक्शन प्लॅन’ अंतर्गत ‘रूफटॉप सोलर’ प्रणालीला प्रोत्साहन देण्याच्या धोरणानुसार हा प्रकल्प राबवला जाणार आहे. यामध्ये कुलाबा, दादर, नरिमन पॉइंट, वांद्रे, बोरीवली, वांद्रे-कुर्ला संकुल, गोरेगाव, दिंडोशी, मुलुंड आणि मानखुर्द या १० अग्निशमन केंद्रांवर, तसेच भायखळा येथील महानगरपालिका मुद्रणालयावर अशाप्रकारे एकूण ११ ठिकाणी हे प्रकल्प साकारण्यात येणार आहेत.

पारंपरिक विजेवरील अवलंबित्व कमी करून सौर ऊर्जेचा प्रभावी वापर म्हणून अक्षय ऊर्जेचा वापर केला जात असून हरितगृह वायू व कार्बन उत्सर्जन कमी करून पर्यावरण संवर्धन राखण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच आपत्कालीन परिस्थितीतही अग्निशमन केंद्रांना अखंडित व स्वावलंबी वीजपुरवठा केला जावू शकतो,असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

https://www.prahaar.in/2026/11/10/mumbai-137-incidents-of-fire-related-mishaps-caused-by-firecrackers-in-a-single-day/

या सौर ऊर्जा प्रकल्पांतून निर्माण होणारी वीज संबंधित अग्निशमन केंद्रे व मुद्रणालय इमारतीच्या स्वतःच्या वापरासाठी असल्याने पारंपरिक विजेवरील अवलंबित्व व वीज देयकाचा खर्च कमी होईल. तसेच महापालिकेच्या कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या उद्दिष्टासही हातभार लागेल. मुंबई शहराच्या सुरक्षेसाठी चोवीस तास कार्यरत असणाऱ्या अग्निशमन दलाने आधुनिकतेची कास धरत ‘हरित आणि शाश्वत मुंबई’ घडवण्याच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. यासाठी तब्बल ४.२६ कोटी रुपये खर्च केला जाणार असून या कामांसाठी सेक्वन ग्रीन्स सोलर सिस्टीम्स प्रा. लि. या कंपनीची निवड करण्यात आली आहे.

मुंबई हवामान कृती आराखड्याच्या प्राथमिक मूल्यांकनात “ऊर्जा आणि इमारती” हे सहा प्रमुख क्षेत्रांपैकी एक महत्त्वाचे क्षेत्र आहे. पारंपरिक औष्णिक वीजनिर्मितीमुळे होणारे कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी अक्षय ऊर्जेला प्रोत्साहन देणे, हे या आराखड्याचे एक उद्दिष्ट असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
कुठल्या अग्निशमन दलाच्या केंद्रांवर किती क्षमतेचा असणार प्रकल्प

बोरीवली : ७५ किलोवॅट (सर्वाधिक)
वांद्रे व मुलुंड : प्रत्येकी ६५ किलोवॅट
दादर व मानखुर्द : प्रत्येकी ६० किलोवॅट
कुलाबा : ५५ किलोवॅट
नरिमन पॉइंट : ५० किलोवॅट
वांद्रे-कुर्ला संकुल व दिंडोशी : प्रत्येकी ३५ किलोवॅट
गोरेगाव : ३० किलोवॅट
भायखळा मुद्रणालय : १०० किलोवॅट (बॅटरी ऊर्जा साठवण प्रणालीसह) व ७० किलोवॅट (बॅटरी प्रणालीशिवाय)

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language