प्रेमाला सीमा नसतात असे म्हणतात, पण प्रत्येक प्रेमकथेचा शेवट हा परिकथेसारखाच होईल असे नाही. डेटिंग ॲपवर ओळख झालेल्या पुरूषासोब लग्न करण्यासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास करून राजस्थानला पोहोचलेली कॅनेडियन महिला त्याने नकार दिल्याने निराश झाली. यामुळे तिने कॅनेडियन दूतावासाशी संपर्क साधला. राजस्थानच्या कोटपुतली बेहरोर जिल्ह्यातील नीमराणा येथे हे प्रकरण उघडकीस आले. जिथे प्रस्तावित लग्नावरून झालेल्या वादानंतर एका महिलेने कॅनेडियन दूतावासाशी संपर्क साधल्यावर पोलिसांना बोलवण्यात आले.
डेटिंग ॲपवर झाली मैत्रीची सुरुवात
नीमराणा पोलीस ठाण्याचे अधिकारी सुरेंद्र यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ती महिला आणि हरियाणातील पानिपतचा रहिवासी असलेला नितीन यांची सुमारे वर्षभरापूर्वी एका डेटिंग ॲपद्वारे ओळख झाली होती. त्यांच्या संभाषणाचे हळूहळू घनिष्ठ मैत्रीत रूपांतर झाले आणि अखेरीस त्या दोघांनी लग्न करण्याचे ठरवले. त्या योजनेनुसार ती महिला पर्यटक व्हिसावर भारतात आली आणि ११ नोव्हेंबर रोजी दिल्लीत दाखल झाली.
https://www.prahaar.in/2026/11/15/boeing-aircraft-collide-at-miami-airport-in-the-us-2-passengers-injured/
पोलिसांनी सांगितले की, नितीन तिला घेण्यासाठी दिल्ली विमानतळावर गेला आणि नंतर तिला नीमराणा येथे घेऊन आला, जिथे ते त्याच्या काका काकूंच्या फ्लॅटमध्ये राहिले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार ती महिला नितीनसोबत हाऊसिंग सोसायटीमध्ये दोन दिवस राहिली. या काळात लग्नाबद्दलची चर्चा पुढे सरकली, पण तिचे वय अंदाजे ६१ असल्याचे समोर आल्यावर प्रकरणाने वेगळे वळण घेतले. पोलिसांनी सांगितले की, त्यानंतर नितीनने लग्नास नकार दिला, ज्यामुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाला. मतभेद झाल्यानंतर त्या महिलेने १३ नोव्हेंबर रोजी कॅनेडियन दूतावासाशी संपर्क साधला आणि अधिकाऱ्यांना घडामोडींची माहिती दिली.
कॅनेडियन दूतावासाकडून माहिती मिळाल्यानंतर नीमराणा पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्या महिलेला व नितीनला पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी तेव्हापासून नितीनला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे, तर त्या कॅनेडियन महिलेची कोटपुतली येथील कोअर सेंटरमध्ये राहण्याची सोय करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, नितीन मूळचा हरियाणातील पानिपतचा असून एका खाजगी शाळेत शिक्षक म्हणून काम करतो. या प्रकरणाची चौकशी सुरु असून चौकशीतील निष्पत्ती आणि त्या व्यक्तीच्या चौकशीच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
Source: Prahaar News
