Hashtagintro

हिजाबशिवाय गाणं गायलं, इराणी गायिकेला तब्बल 74 फटक्यांची शिक्षा!

हिजाबशिवाय गाणं गायलं, इराणी गायिकेला तब्बल 74 फटक्यांची शिक्षा!

Iran Singer Case : इराणमध्ये महिलांसाठी लागू असलेल्या हिजाबच्या कठोर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गायिका परस्तू अहमदी यांना 74 फटके मारण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांच्यासोबत प्रोडक्शन टीममधील अन्य चार सदस्यांनाही हीच शिक्षा देण्यात आली आहे. आक्षेपार्ह आणि अनैतिक मानले जाणारे ऑनलाइन कन्टेंट तयार करून ते प्रसारित केल्याचा केल्याचा ठपका या पाच जणांवर ठेवण्यात आला होता. विशेष म्हणजे या पाचही जणांना दोषी ठरवल्यानंतर ही संतापजनक शिक्षा देण्यात आली. या कारवाईमुळे इराणमधील महिलांच्या स्वातंत्र्याचा आणि अभिव्यक्तीच्या अधिकाराचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

चाबकाने 74 फटके मारण्याची शिक्षा

इराणमधील वृत्तसंस्था एम्तेदादने या प्रकरणी सविस्तर वृत्त दिले आहे. हे वृत्त वकील मुस्तफा नीली यांच्या हवाल्याने देण्यात आले आहे. 74 फटके मारण्याच्या शिक्षेसोबतच परस्तू अहमदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर पुढील दोन वर्षे संगीत तसेच कला क्षेत्रातील काम करण्यास आणि परदेशात प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. यापूर्वी जून महिन्यात न्यायालयाने त्यांना 74 फटके मारण्याची शिक्षा सुनावली होती. न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात सप्टेंबर महिन्यात वरिष्ठ न्यायालयात अपील करण्यात आले होते. परंतु 74 फटके मारण्याची शिक्षा कायम ठेवण्यात आली.

कॉन्सर्टमुळे वाद का? आक्षेप काय?

डिसेंबर 2024 मध्ये परस्तू अहमदी यांनी पुरुष संगीतकारांसोबत एका विशेष संगीत कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात त्यांनी हिजाब न घालता गाणी सादर केली होती. या कार्यक्रमाचे चित्रीकरण इराणमधील कोम शहराजवळ असलेल्या ऐतिहासिक देइर-ए गचिन कारवांसराय येथे करण्यात आले होते. त्याची व्हिडीओ रेकॉर्डिंग यूट्यूबवर प्रसिद्ध करण्यात आली आणि काही काळातच ती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

दरम्यान, इराणमध्ये महिलांना सार्वजनिक ठिकाणी केस झाकणे बंधनकारक आहे. त्यामुळे या कार्यक्रमाची न्यायपालिकेने गंभीर दखल घेतली. अधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाला बेकायदेशीर ठरवत संबंधितांवर कारवाई केली. या घटनेमुळे इराणमधील हिजाबविरोधी आंदोलनाचीही पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. 2022 साली महसा अमिनी या तरुणीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर देशभरात मोठे आंदोलन झाले होते.

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language